विराट सक्षम कर्णधार : लॉसन
By admin | Published: January 2, 2015 02:06 AM2015-01-02T02:06:59+5:302015-01-02T02:06:59+5:30
भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यास विराट कोहली सक्षम आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ज्योफ लॉसन याने व्यक्त केले आहे़
सिडनी : महेंद्रसिंह धोनी याने अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यास विराट कोहली सक्षम आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ज्योफ लॉसन याने व्यक्त केले आहे़
लॉसन पुढे म्हणाले की, एडिलेड येथे पहिल्या कसोटीत ज्या प्रकारे त्याने आपली कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली़ तेव्हाच तो ही जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला होता़ विशेष म्हणजे संघाची जबाबदारी आल्यानंतर त्याच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही, असेही ते म्हणाले़ कोहली आता केवळ संघातील एक खेळाडू नव्हे, तर कर्णधार झाला आहे़ त्यामुळे त्याने आपला आक्रमकपणा थोडा कमी करण्याची गरज आहे़ निश्चितच त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आगामी काळात मोठी उंची गाठेल, असा विश्वास लॉसन यांनी व्यक्त केला़ धोनीच्या निवृत्तीबद्दल लॉसन म्हणाले की, धोनीने अखेरच्या कसोटीपर्यंत संघात राहायला हवे होते़ त्यानंतर त्याने निवृत्ती घ्यायची असती़ कदाचित ही कसोटी भारताने जिंकली असती आणि त्याने संघाला विजयी निरोप दिला असता़ मात्र, त्याने आता आपला अंतिम निर्णय जाहीर केला आहे़ तो भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार होता आणि राहील यात शंका नाही, असेही लॉसन यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)