विराट कर्णधार, संघात ‘कॅप्टन कूल’ नाही...
By Admin | Published: April 5, 2016 12:43 AM2016-04-05T00:43:15+5:302016-04-05T00:43:15+5:30
टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची आयसीसी टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक
कोलकाता : टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची आयसीसी टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसीने आपला जागतिक संघ निवडला आणि कोहलीकडे या स्टार संघाचे नेतृत्व सोपविले. अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतीय टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह इतर कोणताही भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही.
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा समावेश असलेल्या एका समितीने यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीनुसार आयसीसीचा संघ निवडला. संपूर्ण स्पर्धेत १३६.५०च्या शानदार सरासरीने २७३ धावा कुटलेल्या कोहलीची कर्णधारपदी निवड करण्यात आली. तसेच, भारताच्या जवळपास सर्वच सामन्यांत नेहराने संघाला सुरुवातीलाच यश मिळवून दिले.
> संघात ‘कॅप्टन कूल’ नाही...
मोक्याच्या वेळी तुफानी हल्ला करून टीम इंडियासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीची या संघात न झालेली निवड लक्ष वेधणारी ठरली. फलंदाजीत जरी अपयशी ठरला, तरी आपले कल्पक नेतृत्व आणि चपळ यष्टीरक्षण यांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना झुंजायला लावणाऱ्या धोनीचा समावेश संघात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
> आयसीसी टी-२० संघ :
पुरुष : जेसन रॉय (इंग्लंड), क्विंटन डीकॉक (दक्षिण आफ्रिका, यष्टिरक्षक), विराट कोहली (भारत, कर्णधार), जो रुट (इंग्लंड), जोस बटलर (इंग्लंड), शेन वॉटसन (आॅस्टे्रलिया), आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज), मिशेल सँटनर (न्यूझीलंड), डेव्हिड विले (इंग्लंड), सॅम्युअल बद्री (न्यूझीलंड), आशिष नेहरा (भारत) आणि मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश, १२ वा खेळाडू)
महिला : सुझी बेट्स (न्यूझीलंड), चार्लोट एडवडर््स (इंग्लंड), मेग लॅनिंग (आॅस्टे्रलिया), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज, कर्णधार), सोफी डेवाइन (न्यूझीलंड), रचेल प्रिस्ट (न्यूझीलंड, यष्टिरक्षक), डिंड्रा डॉट्टीन (वेस्ट इंडीज), मेगन स्कट्ट (आॅस्टे्रलिया), सुन लुस (दक्षिण आफ्रिका), लेघ कास्पेरेक (न्यूझीलंड), अन्या श्रुबसोल (इंग्लंड) व अनाम आमिन (पाकिस्तान, १२वी खेळाडू)
> सलग दुसऱ्यांदा कोहली टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरला.
यंदाच्या स्पर्धेत कोहलीने
५ सामन्यांतून ३ अर्धशतकी खेळी केल्या.
२०१४ साली झालेल्या गतस्पर्धेतही कोहलीने ३१९ धावांसह सर्वोत्तम खेळाडूचा
मान मिळवला होता. त्या वेळी टीम इंडियाने उपविजेपद पटकावले होते.
> निवड समिती :
ज्यौफ अलार्डिस (आयसीसी संचालक), इयान बिशप (माजी वेगवान गोलंदाज, वेस्ट इंडीज), नासीर हुसैन (इंग्लंडचा माजी कर्णधार), मेल जोन्स (माजी फलंदाज, आॅस्टे्रलिया), संजय मांजरेकर (माजी फलंदाज, भारत) आणि लिसा स्थळेकर (माजी अष्टपैलू, आॅस्टे्रलिया)
> अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरल्याने आणि घरच्या मैदानावर विश्वचषक उंचावण्याची संधी गमावल्याने मी निराश आहे. मात्र, सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. घरच्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर खेळण्याचा आम्ही आनंद घेतला. विश्वविजेत्या वेस्ट इंडीजच्या पुरुष व महिला संघाचे मी अभिनंदन करतो.
- विराट कोहली