‘विराट’ युगाचा प्रारंभ !

By admin | Published: January 15, 2017 04:42 AM2017-01-15T04:42:49+5:302017-01-15T04:42:49+5:30

भारतीय क्रिकेटसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक असेल. महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय प्रकारातील कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटी आणि टी-२० प्रकारांप्रमाणे ही जबाबदारी देखील विराट

'Virat' era begins! | ‘विराट’ युगाचा प्रारंभ !

‘विराट’ युगाचा प्रारंभ !

Next

- अमोल मचाले, पुणे

भारतीय क्रिकेटसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक असेल. महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय प्रकारातील कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटी आणि टी-२० प्रकारांप्रमाणे ही जबाबदारी देखील विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाहुणा इंग्लंड यांच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज, रविवारी रंगणार आहे. सचिनचा वारसदार म्हणून सध्या विराटकडे पाहिले जाते. त्यामुळे गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होणाऱ्या या लढतीच्या निमित्ताने एकदिवसीय प्रकारामध्ये प्रारंभ होणाऱ्या ‘विराट’ युगाकडे तमाम क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून आहे.
भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीने संघाला टी-२०, तसेच एकदिवसीय प्रकारातील विश्वविजेतेपद मिळवून दिले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहे. धोनीच्या नेतृत्वाचा हा समृद्ध वारसा पुढे नेण्याचे आव्हान विराटसमोर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार तसेच फलंदाज म्हणून जबरदस्त यश मिळवणारा विराट वनडे संघाचे नेतृत्वदेखील समर्थपणे करेल, असा विश्वास धोनी आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केला होता. धोनी, कुंबळे यांच्याप्रमाणे विराटबद्दलचा आपला विश्वासही सार्थ ठरल्याचे क्षण अनुभवण्यास भारतीय क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.
मुंबईत झालेल्या सराव सामन्यात अर्धशतके झळकाविणारे शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा संघाबाहेर आहे. युवराजसिंग सुमारे एका वर्षाच्या कालखंडानंतर संघात परतला आहे. देशांतर्गत स्पर्धांमधील शानदार फलंदाजीमुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सराव सामन्यातही त्याने मोठे फटके लगावले होते. युवराज फलंदाजीला आल्यावर त्याच्या एका षटकातील सहा षट्कारांची आठवण क्रिकेटप्रेमींना निश्चितच येणार. दुसरीकडे, मनीष पांडे आणि केदार जाधव यांच्यासारखे खेळाडू संघात असल्यामुळे आपले स्थान टिकवण्यासाठी युवीवर दमदार कामगिरी करण्याचा दबाव असेल.
फिरकी विभागात अश्विन-रवींद्र जडेजा या फॉर्मातील जोडीला अमित मिश्राची अनुभवी साथ आहे. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर आणि उमेश यादव असे पर्याय विराटसमोर असतील.

अवघड, पण अशक्य नाही : इयॉन मॉर्गन
भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणे खूप अवघड असते. मात्र, ते अशक्य नक्कीच नाही. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेने भारताला भारतात पराभूत केले होते. न्यूझीलंडविरूद्धची मालिका भारताला २-३ अशा निसटत्या फरकाने जिंकता आली. येथील वातावरणाशी जुळवून घेणे आमच्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक आहे. कसोटीत आमचे फलंदाज अश्विन-जडेजासमोर अपयशी ठरले होते. फिरकी गोलंदाजी ही आमच्यासाठी अडचण आहेच.

विजयी सातत्यासाठी टीम इंडिया सज्ज : कोहली
येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. विश्वचषकाखालोखाल महत्त्व असलेल्या या स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारतासमोर यजमान इंग्लंड मुख्य प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असेल. त्यामुळे चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लंडविरूद्धची ही मालिका टीम इंडियासाठी खचितच महत्त्वाची आहे. संपूर्ण संघ पहिल्या लढतीसाठी तयारीनिशी सज्ज आहे. मालिकेतील तिन्ही सामने आम्ही बाद फेरीच्या लढतीप्रमाणे खेळू.

सर्व खेळाडू फिट : विराट
सामन्याच्या आदल्या दिवशी सकाळी अनेक भारतीय खेळाडूंनी सराव केला नाही. दुखापत झाल्यामुळे खेळाडूंनी सराव टाळला का, या प्रश्नाच्या उत्तरात हा नवा कर्णधार म्हणाला, ‘‘संघातील सर्व खेळाडू फिट आहेत. मीदेखील आज सराव केला नाही. याचा अर्थ मी फिट नाही, असा नव्हे. पुरेशा विश्रांतीमुळे गोलंदाजही ताजेतवाने झाले आहेत. फलंदाजांचा तर प्रश्नच नाही.’’

शिखरला वेळ द्यायला हवा
गेल्या काही सामन्यांत शिखर धवनला चांगली कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी त्याला आणखी थोडा वेळ द्यायला हवा, असे मत विराटने मांडले. तो म्हणाला, ‘‘शिखर एकदा लयीत आला की, प्रतिस्पर्ध्यांना कुठलीही संधी नसते. मला त्याची ही गोष्ट खूप आवडते. फॉर्मात येण्यासाठी आपण त्याला आणखी संधी द्यायला हवी.’’

‘डीआरएस’साठी धोनीचा सल्ला मोलाचा
यष्टिरक्षक म्हणून धोनीने फलंदाजांविरूद्ध केलेले ९५ टक्के अपिल यशस्वी ठरले आहे. डीआरएससंदर्भात मला फारसा विचार करण्याची आवश्यकता नसेल. यासाठी धोनीचा निर्णय अंतिम असेल, असे कोहलीने सांगितले.

युवीच्या समावेशामुळे मध्यफळी बळकट
युवराज महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या समावेशामुळे मध्यफळी बळकट झाली आहे. धोनी आणि युवराज हे मध्यफळीतील महत्वाचे फलंदाज आहेत. आपल्याकडे हार्दिक पंड्या, केदार जाधव यांच्यासारखे मध्यफळीतील नवे खेळाडू आहेत. मात्र, मध्यफळीत अनुभवी फलंदाज असणे संघासाठी लाभदायक असते, असे विराटने नमूद केले.

यातून निवडणार प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, लोकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव.
इंग्लंड : इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टॉ, जॅक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लियाम डॉसन, अ‍ॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हीड विली आणि ख्रिस व्होक्स.

सामन्याची वेळ
दु. १.३0 पासून

Web Title: 'Virat' era begins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.