विराटची कमाल, केदारची धमाल! पहिल्या वनडेत भारताची बाजी
By admin | Published: January 15, 2017 02:11 PM2017-01-15T14:11:34+5:302017-01-15T22:00:02+5:30
कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडने दिलेल्या 351 धावांच्या आव्हानाचा तीन गडी राखून यशस्वी पाठलाग केला.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - पूर्णवेळ कर्णधार म्हणून संघाची सूत्रे हाती आल्यानंतर विराट कोहलीने पहिल्याच लढतीत केलेली दमदार शतकी खेळी, त्याला घरच्या मैदानावर खेळत असलेल्या केदार जाधवने तुफानी शतक ठोकून दिलेली जबरदस्त साथ, दोघांनीही पाचव्या विकेटसाठी केलेली द्विशतकी भागीदारी आणि मोक्याच्या क्षणी दोन, तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने केलेली समयोचित खेळी या सर्वाच्या जोरावर भारताने आज पुण्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडला तीन गडी राखून कात्रजचा घाट दाखवला. या विजयाबरोबरच भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 351 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अडखळला आहे. शिखर धवन (1), लोकेश राहुल (8), युवराज सिंग (15) आणि महेंद्र सिंग धोनी (6) हे खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली. मात्र कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. यादरम्यान, विराटने इंग्लिश फलंदाजांची जोरदार धुलाई करताना 93 चेंडूतच शतकी मजल मारली. त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे 27 वे शतक ठरले. या खेळीदरम्यान विराटने केदार जाधवसोबत द्विशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयासमीप पोहोचवले. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर विराट 122 धावा काढून बाद झाला. मात्र त्याने बाद होण्यापूर्वी केदारसोबत 200 धावांची भागीदारी करत लढतीचे पारडे भारताकडे झुकवले.
After the captain, @JadhavKedar joined the century wagon. How good has this knock been @Paytm#TeamIndia#INDvENGpic.twitter.com/VvINcSpOuh
— BCCI (@BCCI) 15 January 2017
विराट बाद झाल्यावर केदारने सूत्रे हाती घेत आपले दुसरे वनडे शतक अवघ्या 65 चेंडूत पूर्ण केले. मात्र केदार जाधवही 120 धावा काढून बाद झाला.
यजमान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 350 धावा फटकावत भारतासमोऱ विजयासाठी 351 धावांचे आव्हान ठेवले. जेसन रॉय आणि जो रूट यांच्या आक्रमक अर्धशतकांनंतर बेन स्टोक्सने केलेल्या घणाघाती फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.
इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अॅलेक्स हेल्स 9 धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर जेसन रॉय (73) आणि जो रूट (78) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 69 धावा जोडत संघाला सुस्थितीत नेले. रॉय आणि रूटच्या अर्धशतकांनंतर शेवटच्या षटकांमध्ये बेन स्टोक्स (40 चेंडूत 62 धावा) आणि मोईन अली (16 चेंडूत 28 धावा) यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 350 धावा फटकावल्या. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताची गोलंदाजी आज पूर्णपणे निष्प्रभ ठरली. भारताकडून हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी दोन बळी टिपले. मात्र त्यांची गोलंदाजीही महागडी ठरली. शेवटच्या दहा षटकांत इंग्लंडने शंभरहून अधिक धावा कुटल्या.
तत्पूर्वी भारत आणि पाहुणा इंग्लंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातून अजिंक्य रहाणेला वगळण्यात आले . तर, महाराष्ट्राचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला संधी देण्यात आली. विराटने संघात अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली.
That is how you finish things off. In style! #TeamIndia go 1-0 up in the series @Paytm#INDvENGpic.twitter.com/BAAtZemVtG
— BCCI (@BCCI) 15 January 2017