विजयपाठोपाठ विराटचेही शतक, पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 356
By admin | Published: February 9, 2017 10:03 AM2017-02-09T10:03:29+5:302017-02-09T17:04:49+5:30
हैदराबाद कसोटीत मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही शतक फटकावले आहे. पहिल्या दिवसअखेर भारताच्या
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 9 - एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर हुकुमत राखली. सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 356 धावा कुटल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट 111 तर अजिंक्य रहाणे 45 धावांवर खेळत होते.
मुरली विजय शतक फटकावून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेत खेळाच्या तिसऱ्या सत्रात पाहुण्या गोलंदाजांना झोडपून काढले. कोहलीची फटकेबाजी पाहून रहाणेनेही फलंदाजीचा गिअर बदलला. दरम्यान, आक्रमक पवित्रा घेणाऱ्या विराटने आपले कसोटी कारकीर्दीतील 16वे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या 130 चेंडूतच शतकी मजल मारली. दरम्यान त्याने अजिंक्य रहाणेसोबत अभेद्य 122 धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 356 धावांपर्यंत मजल मारून दिली.
त्याआधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. मात्र लोकेश राहुल (2) स्वस्तात बाद झाल्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि मुरली विजयने डाव सावरत उपाहारापर्यंत भारताला 1 बाद 86 धावांपर्यंत मजल मारून दिली. विजय आणि पुजाराच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची भागीदारी करत भारताला सुस्थितीत पोहोचवले. दरम्यान, पुजार 83 धावांवर बाद झाला. पण विजयने मात्र आपले शतक पूर्ण केले. विजयचे हे कसोटी क्रिकेमधील नववे शतक ठरले. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर विजय फारवेळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही आणि 108 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (111) आणि अजिंक्य रहाणे (45) यांनी शतकी भागीदारी कर भारताला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. बांगलादेशकडून तस्किन अहमद, मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.