विराट कोहली आणि रवी शास्त्रींमुळे धोनीचा कसोटीला रामराम ?
By admin | Published: December 31, 2014 12:11 PM2014-12-31T12:11:43+5:302014-12-31T12:17:43+5:30
महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटला सोडचिठ्ठी देत सर्वांनाच धक्का दिला असला तरी धोनीच्या निवृत्तीमागे विराट कोहली आणि रवि शास्त्री कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटला सोडचिठ्ठी देत सर्वांनाच धक्का दिला असला तरी धोनीच्या निवृत्तीमागे विराट कोहली आणि रवि शास्त्री कारणीभूत असल्याची चर्चा आहे. ड्रेसिंग रुममध्ये कोहली आणि शास्त्री यांची जवळीक वाढत असल्याने धोनीच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता असे समजते.
मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यावर महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली आहे. धोनीची निवृत्ती तडकाफडकी असली तरी त्याने निवृत्ती संदर्भात यापूर्वीच संकेत दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय ड्रेसिंग रुममधील बदलत्या समीकरणांमुळे धोनीने हा निर्णय घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यात विराट कोहली आणि संघाचे संचालक रवी शास्त्री यांची जवळीक वाढली होती आणि याचा अनुभव पहिल्या कसोटी सामन्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघ आक्रमक खेळ करत होता आणि मैदानात भारतीय खेळाडू व ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये खटकेही उडत होते. या सर्व गोष्टी धोनीच्या विरोधात जात होत्या. धोनी हा मैदानावर शांत आणि संयमी कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यांच चांगले संबंध होते. त्यामुळे संघ धोनीच्या कार्यपद्धतीनुसार चालत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून संघातील अनेक निर्णयांमध्ये रवी शास्त्रींचा हस्तक्षेप वाढला होता. पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला काटे की टक्कर दिल्यानंतर कोहली - शास्त्री हे सूत्र राबवण्याची मागणी वाढली होती. साहजिकच धोनीला यामध्ये अडथळा आणायचा नव्हता व त्याने कसोटी क्रिकेटलाच अलविदा केले अशी चर्चा जोर धरु लागली आहे.