विराट कोहलीच सर्वोत्कृष्ट, मोहम्मद आमीरकडून तोंडभरुन कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:51 PM2017-07-18T13:51:09+5:302017-07-18T13:52:46+5:30
मोहम्मद आमीरसमोर रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्स यांचे पर्याय असतानाही त्याने विराट कोहलीचीच निवड केली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने भारताचा अक्षरक्ष: धुव्वा उडवणा-या पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरने विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहली जगातील सर्वात उत्कृष्ट फलंदाज असल्याचं मोहम्मद आमीर बोलला आहे. विशेष म्हणजे मोहम्मद आमीरसमोर रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्स यांचे पर्याय असतानाही त्याने विराट कोहलीचीच निवड केली. मोहम्मद आमीरने ट्विटरवर चॅट सेशन ठेवलं होतं. यावेळी त्याला या चौघांपैकी सर्वात्कृष्ट फलंदाज कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना त्याने सांगितलं की, "चौघेही उत्तम आहे पण वैयक्तिकरित्या विराट कोहली".
पुढच्या प्रश्नालाही मोहम्मद आमीरने आपल्याला विराट कोहलीच सर्वात्कृष्ट वाटत असल्याचं सांगितलं. तुझ्या मते सध्या सर्वात्कृष्ट फलंदाज कोण आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तरही मोहम्मद आमीरने विराट कोहली असंच दिलं.
They all are but personally Virat kohli https://t.co/lYFNz4P5y2
— Mohammad Amir (@iamamirofficial) July 16, 2017
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मोहम्मद आमीरने भारतीय फलंदाजांची दांडी गुल करत संघाला विजय मिळवून दिला. आमीरने विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची विकेट घेत सामन्यावर पकड मजबूत केली होती. मोहम्मद आमीरने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या आधारे पाकिस्तानने अंतिम सामना तब्बल 180 धावांनी जिंकला आणि भारताचा दणदणीत पराभव केला. सोबतच पहिल्यांदा आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकली.
Virat kohli https://t.co/MzcRQfBigg
— Mohammad Amir (@iamamirofficial) July 16, 2017
यावेळी मोहम्मद आमीरने 2009 रोजी झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफी सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची विकेट मिळवल्यानंतर तितकाच आनंद झाला असल्याचं सांगितलं. तसंच 2016 रोजी एशिया कपमध्ये केलेली गोलंदाजी आपली आत्तापर्यतची सर्वोत्तम होती असंही त्याने सांगितलं. भारतासमोर त्या सामन्यात फक्त 83 धावांचं आव्हान होतं. पण मोहम्मद आमीरने रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैनाची झटपट विकेट मिळवल्याने आठ धावांवर तिन विकेट्स अशी दयनीय परिस्थिती झाली होती. अखेर विराट कोहलीने केलेल्या सुरेख फलंदाजीमुळे भारताला तो सामना जिंकता आला.
विराट कोहली आणि मोहम्मद आमीरने याआधीही एकमेकांचं कौतुक केलं आहे. मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकल्यानंतर संघात पुनरागन करताना विराट कोहलीने आमीरला शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच टी20 वर्ल्ड कपदरम्यान दोन्ही संघांमध्ये होणा-या सामन्याआधी विराट कोहलीने आमीरला बॅट भेट म्हणून दिली होती.