विराट कोहली अग्रस्थानी कायम
By admin | Published: August 30, 2016 08:57 PM2016-08-30T20:57:49+5:302016-08-30T20:57:49+5:30
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. त्याचवेळी आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या
आयसीसी टी२० : अश्विनचे टॉप फाइव्हमध्ये पुनरागमन
दुबई : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. त्याचवेळी आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल ५ स्थानांमध्ये पुनरागमन केले आहे. त्याची तीन स्थानांनी प्रगती झाली असून ताज्या क्रमवारीनुसार अश्विन चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
वेस्ट इंडिजयविरुध्द अमेरिकेतील लॉडरहिल येथे झालेल्या दोन सामन्यांच्या टी२० मालिकेत नाबाद शतक झळकावणारा लोकेश राहुलने तब्बल ६७ क्रमांकानी मोठी झेप घेत ३१वे स्थान पटकावले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विक्रमी ४८९ धावा काढल्या गेल्या. यामध्ये राहुलने नाबाद ११० धावांची घणाघाती खेळी केली होती. विंडिजने प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा केल्या होत्या आणि या धावांचा पाठलाग करताना भारताला २४४ धावांवर समाधान मानावे लागले होते.
त्याचवेळी दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर विंडिजने ही मालिका १-० अशी जिंकली. या विजयासह विंडिज संघाने आयसीसी टी२० क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या भारत आणि आपल्या गुणांमध्ये केवळ एका गुणाचे अंतर ठेवले आहे.
दोन वेळचा टी२० जगज्जेत्ता वेस्ट इंडिज संघ या मालिकेआधी १२८ गुणांसह दुसºया स्थानी असलेल्या भारताहून सहा गुणांनी मागे होता. आता वेस्ट इंडिजचे १२५ गुण असून भारताचे गुण १२६ झाले आहेत. न्यूझीलंड सर्वाधिक १३२ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. (वृत्तसंस्था)