विराटचा धोनीवर ‘छुपा हल्ला’
By admin | Published: June 26, 2015 01:20 AM2015-06-26T01:20:50+5:302015-06-26T01:20:50+5:30
टीम इंडियाच्या निर्णयक्षमतेतील विश्वासाचा अभाव तसेच स्पष्टपणाची उणीव आणि मैदानावर खेळाडू मनमोकळेपणाने व आत्मविश्वासाने खेळताना दिसत नव्हते,
मिरपूर : टीम इंडियाच्या निर्णयक्षमतेतील विश्वासाचा अभाव तसेच स्पष्टपणाची उणीव आणि मैदानावर खेळाडू मनमोकळेपणाने व आत्मविश्वासाने खेळताना दिसत नव्हते, असा आरोप करून भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने सनसनाटी निर्माण केली आहे. त्याचा हा आरोप म्हणजे संकटात सापडलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर छुपा हल्ला मानला जातो.महेंद्रसिंह धोनी याने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर कसोटी कर्णधार बनविण्यात आलेल्या कोहलीने कुणाचेही नाव न घेता हा आरोप केला. निर्णय घेण्यासंबंधी उच्चारलेल्या आपल्या वक्तव्याचाही त्याने सविस्तर उलगडा केला नाही. काल उशिरा रात्री तो म्हणाला, ‘‘बांगलादेशाने खरे तर फार सुरेख खेळ केला. प्रामाणिकपणे सांगायचे तर मैदानावर निर्णय घेण्यात आमच्यात विश्वासाचा अभाव जाणवला. पहिल्या दोन्ही सामन्यांत विजयाच्या मानसिकतेसह आम्ही खेळलोच नाही. मला एका मुलाखतीत या गोष्टी सांगायची गरज नाहीच. क्रिकेट जाणणारे आणि तज्ज्ञ या बाबी समजू शकतात. खेळाडू आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करण्यास पूर्णपणे सज्ज नव्हते.’’
कोहलीचे हे वक्तव्य आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या वक्तव्याच्या एक दिवसानंतर आले. आश्विनने कर्णधारासाठी जीव देण्याचीही तयारी दर्शविली होती. अन्य एक ज्येष्ठ खेळाडू सुरेश रैना याने धोनीला पाठिंबा दिला. कोहलीच्या वक्तव्याने वन डे संघात फुटीची ठिणगी पाडल्याचे मानले जात आहे. चेन्नई सुपरकिंग्सचे खेळाडू धोनीला पाठिंबा दर्शवीत आहेत. तथापि, कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडल्याचा इन्कार केला. तो म्हणाला, ‘‘ड्रेसिंग रूमचा माहोल आधीसारखाच आहे. आम्ही काही सामने गमावले खरे; पण अधिकाधिक सामने जिंकलेदेखील आहेत.’’ (वृत्तसंस्था)