कोहली, डिव्हिलयर्सपुढे सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचे लोटांगण
By admin | Published: April 12, 2016 09:40 PM2016-04-12T21:40:16+5:302016-04-12T22:36:46+5:30
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने निर्धारित २० षटकांत ४ गड्याच्या मोबदल्यात विराट २२७ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी निर्धारित २० षटकात २२८ धावांची गरज आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १२ - कर्णधार विराट कोहली (७५) आणि क्रिकेटमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलयर्स (८२) यांनी केलेल्या धुवांधार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने निर्धारित २० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विराट २२७ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी निर्धारित २० षटकांत २२८ धावांची गरज आहे.
भुवनेश्वर कुमारने धोकादायक ख्रिस गेलला पहिल्याच षटकात बाद करत आरसीबीला बॅकफूटवर आणले होते. पण विराट कोहली आणि एबी डिव्हिलयर्सने सावध सुरुवात केली आणि मैदानावर जम बसवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४.३ षटकांत १५७ धावांची विक्रमी भागीदारी केली. यामध्ये त्यांनी १०.८च्या सरासरीने धावा चोपल्या.
एबी डिव्हिलयर्सने चौफेर फलंदाजी करताना ४० चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकार लगावत झटपट ८२ धावा वसूल केल्या. एबीचं आयपीएलमधलं हे १६ अर्धशतक होय. कोहलीने आयसीसी टी २० मधील आपला जलवा कायम राखला. त्याने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ५१ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकार लगावत संयमी पण आक्रमक ७५ धावा केल्या. कोहलीने ७५ धावा करत आयपीएलमधील २०ने अर्धशतक पूर्ण केले.
कोहली बाद झाल्यानंतर शेन वॉटसनही धावगती वाढवण्याच्या नादात ८ चेंडूंत १९ धावा काढून बाद झाला. या छोट्या पण आक्रमक खेळीत त्याने ३ षटकांर लगावले. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सर्फराज खानने केदार जाधवच्या साथीनं संघाची धावसंख्या २००च्या वर पोहोचवली. केदार जाधवने ६ चेंडूंत ८ धावांची खेळी केली, तर सर्फराजने १० चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने झटपट ३५ धावा करत २० षटकांत संघाची धावसंख्या २२७ नेऊन ठेवली. सर्फराज खान आणि केदार जाधवने पाचव्या विकेटसाठी १५ चेंडूंत ४४ धावा झोडल्या.
सनरायझर्स हैदराबादला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चांगलाच अंगाशी आला. आरसीबीच्या फलंदाजांपुढे सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. गेलला लवकर बाद करूनही इतर फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि मुस्तफिझूर रहमानने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.
उभय संघ -
सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, कर्ण शर्मा, इऑन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, मोझेस हेन्रिक्स, नमन ओझा, आशिष रेड्डी, दीपक हु्ड्डा.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस गेल, एबी डिव्हिलयर्स, मॅडम मिल्ने, सर्फराझ खान, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, परवेझ रसूल, हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल.