विराट कोहलीचा Pepsiची जाहिरात करण्यास नकार
By Admin | Published: June 6, 2017 09:31 AM2017-06-06T09:31:02+5:302017-06-06T09:46:23+5:30
"ज्या गोष्टी मी स्वत: खात, पीत नाही, त्या मी दुस-यांना कसं काय खाण्यास सांगू शकतो" असं विराट कोहली बोलला आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पेप्सीला जोरादर झटका दिला आहे. विराट गेल्या सहा वर्षांपासून पेप्सीसोबत जोडला गेलेला आहे. मात्र आता त्याने पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला. "ज्या गोष्टी मी स्वत: खात, पीत नाही, त्या मी दुस-यांना कसं काय खाण्यास सांगू शकतो", असं विराट बोलला आहे. फक्त पैसे कमावण्यासाठी मी लोकांना काहीही खाणं - पिण्यास कसं काय सांगू शकतो ? असाही प्रश्न विराटला पडला आहे.
विराटने पेप्सीची जाहिरात न करण्यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, "याआधी ज्या गोष्टींचा मी स्विकार केला होता ज्यांचा उल्लेख मी करु इच्छित नाही, त्यांच्यासोबत स्वत:ला जोडू शकत नाही".
साखर आणि कार्बोनेटेड पेयांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम आणि वाढता धोका सध्या चर्चेचा विषय असून यादरम्यानच विराट कोहलीने हा निर्णय घेतला आहे. विराट कोहली गेल्या सहा वर्षांपासून पेप्सीसोबत जोडला गेलेला आहे. करार संपत असून पेप्सीने हा करार पुढे वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कोहली सध्या 18 ब्रॅण्डसोबत जोडला गेला आहे, ज्यामध्ये एमआरएफ टायर्स, टिसॉट, प्यूमा स्पोर्ट्स गिअर, कोलगेट ऑरल केअर, ऑडी कार्स सारखे ब्रॅण्ड सामील आहेत.
इंग्लंडमध्ये आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळत असलेल्या विराट कोहलीने सांगितलं आहे की, "जेव्हा मी आपला फिटनेस टर्नअराऊंड सुरु केला, तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही माझ्या लाईफस्टाईलपेक्षा मोठी गोष्ट होती. मात्र त्यापेक्षा वेगळं काही होत असेल तर त्याचा भाग होण्याची माझी इच्छा नाही".