चौथ्या कसोटीतून विराट कोहलीची माघार?
By admin | Published: March 23, 2017 08:45 PM2017-03-23T20:45:54+5:302017-03-23T20:45:54+5:30
चौथा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरतील. विराट कोहली संघाबाहेर गेल्यास भारताची फलंदाजी कुमकुवत होऊ शकते.
ऑनलाइन लोकमत
धर्मशाळा, दि. 23 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या खेळण्यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरला नसल्यामुळे शनिवारी धर्मशाळा येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात मुकण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबतची माहिती अद्याप आलेली नाही, पण संघव्यवस्थापकांनी मुंबईकर फलंदाज श्रेअस अय्यरला धर्मशाळा येथे पाचारण केले आहे. यापुर्वीच भारतीय संघासोबत वेगवान गोलंदाज मोहमद्द शमीही धर्मशाळा येथे पोहचला आहे.
चौथ्या कसोटीत दुखापतीमुळे विराट कोहली संघाबाहेर बसला तर मुंबईकर अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा साभांळेल. चौथ्या कसोटीत रहाणेने कर्णधारपद सांभाळल्या सचिननंतरचा पहिलाच मुंबईकर कर्णधार असेल. चार कसोटी सामन्याची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून धर्मशाळा येथील कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरतील. विराट कोहली संघाबाहेर गेल्यास भारताची फलंदाजी कुमकुवत होऊ शकते.