विराट कोहलीला एका स्थानाचा फटका
By admin | Published: March 14, 2017 12:53 AM2017-03-14T00:53:55+5:302017-03-14T00:53:55+5:30
आॅस्टे्रलियाविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला फटका बसला
दुबई : आॅस्टे्रलियाविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला फटका बसला असून त्याची आयसीसी फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली. त्याचवेळी स्टार फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असून गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये अग्रस्थान कायम राखले आहे.
कोहलीची चौथ्या स्थानावर घसरण झाली असून सध्या त्याच्या नावावर ८४७ गुणांची नोंद आहे. त्याने आतापर्यंत आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेतील चार डावांमध्ये अनुक्रमे शून्य, १३, १२ आणि १५ धावांची खेळी केली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याला दोन स्थानांचा फायदा झाला असून त्याने चौथे स्थान पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १३० धावांची
खेळी करून विल्यम्सने इंग्लंडचा ज्यो रुट आणि कोहली यांना मागे टाकले आहे.
विल्यम्सनचे ८६९ गुण असून तो तिसऱ्या स्थानावरील रुटहून (८४८) २१ गुणांनी पुढे आहे. त्याचवेळी, आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९३६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानी कायम आहे.
दुसरीकडे, गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल १० स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी संयुक्तपणे अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याचवेळी, अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये आश्विनने बांगलादेशच्या शाकिब-अल-हसनला मागे टाकून पुन्हा एकदा अव्वल स्थानावर कब्जा केला. आश्विनने ४३४ गुणांसह अग्रस्थान मिळवले असून तो शाकिबहून (४०३) ३१ गुणांनी पुढे आहे.
(वृत्तसंस्था)