विराट कोहली अव्वल स्थानावर
By admin | Published: June 14, 2017 01:19 AM2017-06-14T01:19:22+5:302017-06-14T01:19:22+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी.डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकत कोहली अव्वल स्थानावर पोहोचला.
या स्पर्धेच्या आधी कोहली डिव्हिलियर्सपेक्षा २२ आणि आॅस्ट्रेलियाच्या वॉर्नरपेक्षा १९ गुणांनी मागे होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारताचा सामना १५ रोजी बांगलादेशशी होणार असून या सामन्यापूर्वी विराटला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेल्या दमदार फलंदाजीचा फायदा विराट कोहलीला झाला आहे. या स्पर्धेत विराटने आतापर्यंत दोन अर्धशतके केली आहेत. या दोन्ही वेळी विराट नाबाद राहिला असून विराट कोहलीच्या नावे ८६२ अंक आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या वॉर्नरच्या नावावर ८६१ गुण आहेत. एबीडीच्या नावावर ८४७ गुण आहेत. टीम रॅकिंगमध्ये द. आफ्रिका पहिल्या स्थानावर कायम आहे. आॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानार तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
शिखर ‘टॉप टेन’मध्ये...
शिखर धवन हा पुन्हा एकदा अव्वल दहा खेळाडूंमध्ये पोहोचला आहे. तो आता दहाव्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा तेराव्या आणि महेंद्र सिंह धोनी चौदाव्या क्रमांकावर पोहोचला. युवराज सिंह ८८ व्या स्थानावर आहे. गोलंदाजी भुवनेश्वर कुमार २३ व्या, उमेश यादव ४१ व्या क्रमांकावर आहे, तर जसप्रीत बुमराह ४३व्या क्रमांकावर पोहोचला. फिरकीपटू आर.अश्विन २० व्या, तर रवींद्र जाडेजा २९ व्या क्रमांकावर आहे.