विराटनं सोडलं शतकावर पाणी, तरीही रचला वनडे इतिहासातला मोठा रेकॉर्ड
By admin | Published: June 15, 2017 10:16 PM2017-06-15T22:16:47+5:302017-06-15T23:11:41+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिगहॅम, दि. 15 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. बांगलादेशने दिलेल्या 265 धावांचे आव्हान भारताने शिखर धवनच्या मोबदल्यात पूर्ण केले. रोहित शर्माची शतकी खेळी आणि विराटच्या कॅप्टन इनिंगमुळे भारताने बांगलादेशवर नऊ गडी राखून सहज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने नाबाद राहून शानदार शतक झळकावलं तर कर्णधार विराट कोहलीनेही नाबाद 96 धावांची खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीला शतक झळकवण्याची आणखी एक संधी होती. एकवेळ आवश्यक धावसंख्येपेक्षा भारताची धावसंख्या बरीच पुढे होती. धावांची गती कमी करून स्वतःकडे स्ट्राइक ठेवून विराट शतक झळकावूही शकत होता. मात्र, त्याने अपेक्षेप्रमाणे संघाच्या विजयाला महत्व दिलं. असं असलं तरी या सामन्यात विराटने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 8000 धावा काढण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केला आहे. 175 डावांमध्ये विराटने या विक्रमाला गवसणी घातली. यावेळी विराटने ए.बी.डिव्हिलिअर्सला मागे टाकले. डिव्हिलिअर्सने 182 डावांमध्ये 8000 धावांचा टप्पा गाठला होता. बांगलादेशविरूद्ध 88 धावा करताच त्याने हा विक्रम आपल्या नावे केला. तीन दिवसांपूर्वीच विराटने वन-डे क्रमवारीत डिव्हिलिअर्सला मागे टाकत पुन्हा एक नंबर पटकावला होता.