विराट कोहली १६ वर्ष ज्या बँकेचा ग्राहक होता आज त्याच बँकेचा ब्रँड अँबेसेडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 06:39 AM2016-09-18T06:39:40+5:302016-09-18T07:57:03+5:30
बॅटच्या वेगवान मा-यानं सगळ्यांना घायाळ करणारा क्रिकेटपटू विराट कोहली आता पीएनबीचं ब्रँडिंग करणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - बॅटच्या वेगवान मा-यानं सगळ्यांना घायाळ करणारा क्रिकेटपटू विराट कोहली आता पीएनबीचं ब्रँडिंग करणार आहे. पंजाब नॅशनल बँक(पीएनबी)नं विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी नियुक्ती केली आहे. भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहलीला पीएनबीनं अँबेसेडरपद बहाल केल्यानं सर्व आश्चर्यचकित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्जाच्या खाईत डुबणा-या बँकेला वर काढण्यासाठी पीएनबीच्या संचालक मंडळानं विराट कोहलीला ब्रँड अँबेसेडर केल्याची चर्चा आहे.
पीएनबीनं विराट कोहलीला अँबेसेडरपद दिल्यानंतर त्याच्यावर स्तुतिसुमनंही उधळली आहेत. पीएनबी बँकेला जागतिक बँक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीमध्ये एकाग्रता आणि समाजाप्रति बांधिलकी असल्यानं त्याला ब्रँड अँबेसेडर केल्याचं पीएनबीनं सांगितलं आहे. यावेळी विराट म्हणाला, "पीएनबी ही माझी बँक आहे आणि त्या बँकेचा गेल्या 16 वर्षांपासून मी ग्राहक आहे."
ब-याचदा क्रिकेटपटू खेळासंबंधित उत्पादनाचा प्रचार करताना आढळून येतात. क्रिकेटपटूंसाठी बँकेचं ब्रँडिंग करणं तसे कठीण काम असून, विराटनं तेही आव्हान स्वीकारलं आहे. विशेष म्हणजे याआधी विराट कोहलीनं एडिडास, बूस्ट, फास्ट्रेक, फेअर अँड लव्हली, पेप्सी सारख्या मोठ्या कंपन्यांचं ब्रँड अँबेसेडरपद भूषवलं आहे. त्यामुळे विराट कोहलीची ब्रँड अँबेसेडरपदी निवड करून पीएनबीला किती फायदा होणार हे येत्या काळातच समजणार आहे.