विराटला धोनीकडून मिळणा-या सल्ल्यामुळे संघाचा फायदा - अय्याझ मेमन
By admin | Published: February 3, 2017 03:38 PM2017-02-03T15:38:15+5:302017-02-03T17:00:42+5:30
नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत मोक्याच्या क्षणी क्षणी विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीच्या सल्ल्याचा फायदा झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत मोक्याच्या क्षणी क्षणी विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीच्या सल्ल्याचा फायदा झाला. स्वत: विराटनेही महेंद्रसिंह धोनीच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळत असल्याची कबुली दिली. पण काही जणांना विराटने अशा प्रकारे धोनीचा सल्ला घेणे आवडलेले नाही. सोशल मीडियावरुन यावर टीका करण्यात आली.
वास्तविक धोनी आणि विराटमध्ये चांगला समन्वय आहे. त्यांच्या या समन्वयाचा संघाला फायदा होत आहे. मैदानावरील अशा घटनांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे असे मत लोकमतचे एडिटोरीयल अॅडव्हायझर अय्याझ मेमन यांनी व्यक्त केले.
अय्याझ मेमन यांनी भारतीय क्रिकेटला भेडसावणा-या विविध मुद्यांचा आढावा घेतला. सध्याच्या निवड समितीकडे अनुभवाची कमतरता आहे त्यावर ते म्हणाले की, चांगला क्रिकेटपटू चांगला निवडकर्ता असेलच असे नाही. निवड समिती सदस्याचे काम क्रिकेटपटूची माहिती गोळा करुन कामगिरीच्या आधारावर निवड करणे आहे असे त्यांनी सांगितले.
राहुल द्रविडची अंडर -19 संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करणे हा अत्यंत चांगला निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षकाचे काम संघ बांधून ठेवायचे असते असे मेमन म्हणाले. क्रिकेटच्या तीन प्रकारांमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार ही पद्धत भारताला मानवणारी नसल्याचे त्यांनी सांगितले. टी-20 क्रिकेटवर टीका होत असली तरी, टी-20 मुळे क्रिकेटचा स्तर उंचावल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी कसोटी क्रिकेटला मोठा प्रेक्षकवर्ग होता. लोक मोठया संख्येने सामने पाहायला स्टेडियममध्ये जायचे. त्यातुलनेत आता कसोटी सामन्याच्यावेळी स्टेडियम रिकामे दिसतात. यावर मेमन म्हणाले की, आताही कसोटी क्रिकेटचा प्रेक्षकवर्ग कमी झालेला नाही. लोक टीव्ही, मोबाईल इंटरनेट या माध्यमातून कसोटी क्रिकेट पाहिले जाते असे त्यांनी सांगितले.