कोहलीच्या या मागणीने BCCIला बसला आश्चर्याचा धक्का
By admin | Published: April 3, 2017 06:23 PM2017-04-03T18:23:47+5:302017-04-04T10:35:47+5:30
कर्णधाराच्या या मागणीने बीसीसीआयला आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे सांगितले जात असून बीसीसीआयच्या प्रशासक समितीने येत्या 5 एप्रिल रोजी बैठक घेऊन या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - नुकतेच बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक मानधनात दुपटीने वाढ केली आहे. तरीही भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्यावर नाराजी व्यक्त करत बीसीसीआयकडे अ गटातील खेळाडूंचे वार्षीक मानधन दोन कोटींवरुन पाच कोटी करण्याची मागणी केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार कोहलीच्या या मागणीनंतर बीसीसीआयला आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षीक मानधनात एक कोटींवरुन दोन कोटी वाढ केली आहे. तर ब गटातील खेळाडूंची वाढ 50 लाखावरुन 1 कोटी केली आहे. तसेच क गटातील खेळाडूच्या वार्षीक मानधनातही 25 लाखावरुन 50 लाख अशी वाढ केली होती.
कर्णधाराच्या या मागणीने बीसीसीआयला आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआयच्या प्रशासक समितीने येत्या 5 एप्रिल रोजी बैठक घेऊन या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. खेळाडूंना आयपीएलचे पर्व संपेपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आहे.
कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा खेळाडू जो रुट यांनाही त्यांच्या संबंधित क्रिकेट बोर्डाकडून आपल्या तुलनेत जास्त मानधन दिले जात असल्याचाही मुद्दा बीसीसीआयसमोर उपस्थित केला. अनिल कुंबळे यांनीही कोहलीच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.