विराटमुळेच निवृत्तीचा विचार बदलला : युवराज सिंग
By admin | Published: January 21, 2017 04:46 AM2017-01-21T04:46:54+5:302017-01-21T04:46:54+5:30
कर्करोगाशी झुंज देत असताना एकवेळ क्रिकेट सोडण्याचा विचार डोक्यात आला होता
कटक : ‘कर्करोगाशी झुंज देत असताना एकवेळ क्रिकेट सोडण्याचा विचार डोक्यात आला होता, पण कर्णधार विराट कोहलीने माझ्यात विश्वास जागवला. त्याने निवृत्त न होण्याचा सल्ला दिला. विराटचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मला झंझावाती फलंदाजीची झलक दाखविणे गरजेचे होते.’ ‘षटकारकिंग’ युवराजसिंग याची ही आपबिती आहे.
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत करियरमधील सर्वोत्कृष्ट १५० धावा ठोकल्यानंतर युवराज म्हणाला, ‘संघ आणि कर्णधार तुमच्या पाठीशी असतील तर आत्मविश्वास संचारणारच! विराटने दाखविलेला विश्वास माझ्यासाठी मोलाचा ठरला. ड्रेसिंग रुम माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी इतक्या धावा करू शकलो. एकवेळ अशी होती की खेळावे की खेळू नये, असे वाटायचे. अनेकांनी मला मदत केली. कधीही हार न मानण्याची माझी वृत्ती आहे. मेहनत करीत राहावे, परिस्थिती बदलेल, असा विश्वास होताच.’
याआधी युवीने अखेरचे शतक २०११च्या विश्वचषकात चेन्नईत ठोकले होते. सहा वर्षांनंतर कर्करोगावर विजय मिळवित मी खेळात परतलो आहे. आधीची दोन-तीन वर्षे कठीण गेली. फिटनेसवर मेहनत घेत राहिल्याने संघात आत-बाहेर होत होतो. यंदा रणजी करंडकात शानदार कामगिरी झाली. आॅक्टोबरमध्ये बडोदा संघाविरुद्ध २६० धावा ठोकल्या. त्याचा लाभ झाल्याचे युवीचे मत आहे.
युवराजला संघात स्थान देण्याबाबत वेगवेगळी मते होती. काहींनी भारतीय संघ मागे जात असल्याची प्रतिक्रिया दिली पण युवीवर याचा परिणाम झाला नाही. मी वृत्तपत्र वाचत नाही अन् टीव्हीदेखील पाहात नसल्याने कोण काय म्हणतो, याची काळजी करीत नाही. माझ्यात क्रिकेट शिल्लक आहे हेच मला दाखवायचे होते. १५० धावा ठोकल्याचा आनंद आहे. ही लय कायम राखायची आहे, असे युवराजने सांगितले.
इंग्लंड संघ धोकादायक असल्याचे नमूद करीत युवी पुढे म्हणाला, ‘सध्याचा इंग्लंड संघ चांगला खेळत असून, मधली फळी फारच धोकादायक असल्याने आमच्या गोलंदाजांचे मनोबल ढासळण्याइतपत त्यांच्याकडे भक्कम फलंदाजी आहे.’ (वृत्तसंस्था)
>धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची साथ कुणाला नको आहे, असे सांगून युवी म्हणाला, ‘करियर सुरू केल्यापासून मी माहीसोबत खेळत आलो आहे. आमच्यात फार चांगला समन्वय आहे. भविष्यातदेखील कायम राहील.
>अमिताभ म्हणाले, ‘व्वा चॅम्पियन’!
युवराजसिंगच्या दुसऱ्या वन डेतील १५० धावांच्या खेळीवर महान अभिनेते अमिताभ बच्चन जाम खूश आहेत. टिष्ट्वटरवर युवीचे अभिनंदन करीत त्यांनी लिहिले, ‘व्वा चॅम्पियन!, भारताने इंग्लंडला हरविले. युवी तू चॅम्पियनसारखा खेळलास.’
सुपरस्टार शहारुख खान यांनी देखील युवराज आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या खेळाचे कौतुक केले. शहारुखने लिहिले, ‘युवी आणि धोनी यांच्याकडून अशी फलंदाजी होताना पाहणे फार आनंददायी असते. खरेच शेरों का जमाना होता हैं !’