कप्तान ढोणीच्या निर्णयक्षमतेवर विराट कोहलीचं प्रश्नचिन्ह
By admin | Published: June 25, 2015 04:59 PM2015-06-25T16:59:35+5:302015-06-25T16:59:35+5:30
कप्तान महेंद्र सिंग ढोणीच्या निर्णयक्षमतेवर प्रश्वचिन्ह उभारत कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली यांनी टीम इंडियामध्ये सारं काही आल वेल नसल्याचे संकेत दिले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - कप्तान महेंद्र सिंग ढोणीच्या निर्णयक्षमतेवर प्रश्वचिन्ह उभारत कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली यांनी टीम इंडियामध्ये सारं काही आल वेल नसल्याचे संकेत दिले आहेत. बांग्लादेशाविरोधात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका हरल्यानंतर कोहलीने आपल्या विचारांना मुक्त वाट देत ढोणीवर टीकास्त्र सोडले.
ज्या पद्धतीनं एकदिवसीय मालिका हाताळली गेली ती पद्धत चुकीचं असल्याचं परखड मत त्याने मांडलं. खेळाडुंच्या मनात त्यांच्या भूमिकेबाबत सुस्पष्टता नसल्याचं सांगत त्याचं प्रतिबिंब खेळावर पडल्याचंही मत व्यक्त केलं. अर्थात, ज्या तडफेने बांग्लादेशची टीम खेळली त्याचं कौतुक करायला हवं असंही कोहली म्हणाला.
कसोटी संघाचा कप्तान झाल्यापासून कोहलीने आक्रमक धोरणांचा कायम पुरस्कार केला आहे. विशेष म्हणजे संघ संचालक रवी शास्त्रीही याच मताचा आहे. एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाने दाखवलेल्या आक्रमकतेबद्दल शास्त्रीने संघाला पार्टीही दिली होती.
भारताने निराशाजनक कामगिरी का केली असा थेट प्रश्न विचारला असता भारतीय संघाचा सामन्यांकडे बघताना दृष्टीकोण काय होता असा प्रतिप्रश्न विचारत कोहलीने ढोणीवर शरसंधान साधलं. आम्ही कुठलाही मिर्णय घेताना साशंक असायचो आणि धोरणात व कृतीत सुस्पष्टतता नव्हती असंही कोहली म्हणतो. याचा अर्थ कोहली कर्णधार ढोणीवर नाराज असल्याचं आणि त्याच्या निर्णयक्षमतेवर खूश नसल्याचं दिसत आहे.
हे घडत असताना सुरेश रैना व आर. अश्विन या दोघांनी मात्र ढोणीची पाठराखण केली आहे. आत्ता कप्तानाला पाठिंब्याची गरज आहे, आणि आत्ता त्याला साथ देणार नाही तर कधी देणार असा सवालही आश्विनने केला.
ढोणीने आत्तापर्यंत जे काही केलं आहे ते विसरता येणार नाही अशी पुष्टीही आश्विनने जोडली आहे. मालिका गमावल्यानंतर ढोणीनेही पायउतार होण्याची तयारी दर्शवली होती. ढोणी व कोहलीमध्ये सध्या वाद असल्याचे दिसत असून संघामध्येच फूट आहे की काय असं वाटावं अशी चिंतेची बाब आहे.