विराटसेना 'बंगळुरू टेस्ट'मध्ये पास! पण...
By admin | Published: March 7, 2017 06:32 PM2017-03-07T18:32:33+5:302017-03-07T18:36:12+5:30
अखेर कोहलीच्या विराट सेनेने बंगळुरू कसोटी जिंकली. दणदणीत म्हणता येणार नाही, पण ऑस्ट्रेलिन संघाच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल, अशा सनसनाटी
Next
> बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
अखेर कोहलीच्या विराट सेनेने बंगळुरू कसोटी जिंकली. दणदणीत म्हणता येणार नाही, पण ऑस्ट्रेलिन संघाच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल, अशा सनसनाटी पद्धतीने भारतीय संघाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर विजयाचा झेंडा रोवला. प्रतिस्पर्धी संघाच्या जबड्यातून आम्ही विजयश्री खेचून आणू शकतो, हेही भारतीय संघाने दाखवून दिले. तशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी सनसनाटी कामगिरी करण्याची भारतीय संघाची परंपराच आहे म्हणा. मग 2001 ची ऐतिहासिक कोलकाता कसोटी, 2003 मधली अॅडलेड कसोटी आणि 2010 मधली मोहाली कसोटी कोण विसरणार!
हा झाला इतिहास, पण पुण्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने ज्या प्रकारे मालिकेत पुनरागमन केले त्याला दाद द्यावीच लागेल. पहिल्या डावात माफक धावाच जमवता आल्यानंतर गोलंदाजांनी केलेला तिखट मारा. लोकेश राहुलची दोन्ही डावातील अर्धशतके, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाज वरचढ ठरत असताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेली जबरदस्त भागीदारी आणि शेवटी ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्या गुर्मीसह जमिनदोस्त करणारी अश्विनची गोलंदाजी. हे सर्व गोष्टी पुढील सामन्यापूर्वी संघाचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या आहेत. पुण्यातील पराभवामुळे निर्माण झालेला दबाव आता विरघळून गेलाय. समान्यातील शेवटच्या काही षटकांमध्ये भारतीय संघाने ज्या आक्रमकतेने ऑस्ट्रेलिन फलंदाजांवर हुकूमत गाजवली त्यावरून त्याचे स्पष्टच संकेत मिळू लागले आहेत.
आता बंगळूरूतून सुटलेला विजयाचा वारू रांची आणि धरमशाळेत चौफेर उधळून बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा एकदा भारताच्या ताब्यात यावा, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल. सध्या ही मालिका बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी रांची येथे होणारी तिसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे. या कसोटीतील विजय विजेत्या संघाला मालिकाविजयाच्या जवळ घेऊन जाईल. त्यामुळे भारतीय संघासमोर रांचीमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवावी लागणार आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे घर असलेले रांची शहर 16 ते 20 मार्चदरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यातून प्रथमच कसोटी क्रिकेटच्या नकाशावर येणार आहे. त्या दृष्टीने ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. पण ती कसोटी आपल्या खेळाने ऐतिहासिक ठरवण्याची जबाबदारी भारतीय संघावर असेल. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातील खेळपट्टया पाहता तिथेही फिरकीला अनुकूल अशी आखाडा खेळपट्टीच असण्याची शक्यता आहे. पण हा फिरकीचा आखाडा गळ्याचा फास ठरणार नाही, याची खबरदारी भारतीय संघाला घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने गेल्या दोन सामन्यातील अनुभव भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्या अनुभवाचे चिंतन करून विराटसेनेला आत्मचिंतन करावे लागणार आहे.
बंगळुरूत विजय मिळवला असला तरी त्या विजयाने हुरळून जावे अशी परिस्थिती भारतीय संघासाठी नक्कीच नाही. मालिकेआधी काहीही दावे केले गेले असले तरी भारताला भारतात हरवण्याइतपत क्षमता ऑस्ट्रेलियामध्ये आहे, हेही आता सिद्ध झाले आहे. जर फिरकीच्या आखाड्यात अश्विन आणि जडेजा प्रतिस्पर्ध्यांना हैराण करू शकतात. तर ऑस्ट्रेलियाचे नॅथन लायन आणि स्टीव्ह ओकिफे हेही त्याच फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना अडकवू शकतात. सध्या भारताची फलंदाजीही म्हणावी तशी फॉर्ममध्ये नाही. मुकुंदच्या अपयशाने सलामीच्या चिंता वाढवल्या आहेत. तर कर्णधार विराट कोहलीला गेल्या दोन कसोटीत आलेले अपयशही भारतीय फलंदाजीसाठी अडचणीचे ठरले आहे. पण बंगळुरूत मिळवलेल्या विजयामुळे पुढच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात फारसे फेरबदल होण्याची शक्यता नाही.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आज अश्विन, जडेजा आणि उमेशने केलेली गोलंदाजी आणि भारतीय संघाची मैदानावर दिसलेली आक्रमक आणि सकारात्मक देहबोली. ही आक्रमकता आणि सकारात्मकताच भारतीय संघाला मालिकेती उर्वरित कसोटींमध्ये फायदेशीर ठरणार आहे. रांचीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीस अजून दहा दिवसांचा अवधी आहे. तूर्तास टीम इंडियाला या विजयाचे आणि होळीचे सेलिब्रेशन करू दे. बाकी ऑस्ट्रेलियन संघाला गृहित धरून चालणार नाही आणि अनुकूल खेळपट्ट्या बनवून, आक्रमक शेरेबाजी करून ऑस्ट्रेलियाला रोखता येणार नाही याची जाणीव विराट कोहली आणि भारतीय संघाला वेळ निघून जाण्याआधी झाली, हेही नसे थोडके.