विराट उत्कृष्ट अॅथलिट
By Admin | Published: June 15, 2016 05:17 AM2016-06-15T05:17:39+5:302016-06-15T05:17:39+5:30
विराट कोहली हा अत्यंत व्यावसायिक खेळाडू असून एक उत्कृष्ट अॅथलिटही आहे, असे गौरवोद्गार टीम इंडियाचे फिटनेस कोच शंकर बासू यांनी काढले.
नवी दिल्ली : विराट कोहली हा अत्यंत व्यावसायिक खेळाडू असून एक उत्कृष्ट अॅथलिटही आहे, असे गौरवोद्गार टीम इंडियाचे फिटनेस कोच शंकर बासू यांनी काढले.
टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे फिटनेस कोच म्हणून काम पाहणारे बासू यांच्यानुसार कोहली सर्वांत तंदुरुस्त खेळाडू असून, त्याचे लक्ष्य सर्वश्रेष्ठ खेळाडू बनण्याचे आहे. यासाठी तो खडतर मेहनतही घेत आहे. बासू म्हणाले, ‘‘कोहली जगातील सर्वश्रेष्ठ अॅथलिट बनण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याच्यासाठी कोणत्याही मर्यादा नाही. त्याच्यासमोर अनेक आदर्श असून, कोहली प्रतिस्पर्ध्यांना कधीही घाबरत नाही. अनेक अॅथलिट आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षकांना देतात; मात्र कोहलीसारख्या असाधारण खेळाडू मिळाल्याचा मला गर्व वाटतो.’’
त्याचप्रमाणे, ‘‘कोहली जर तुमच्या कामावर खूष असेल तर तो कधीच तुम्हाला आव्हान देणार नाही. तो कितीही मेहनत करण्याची तयारी असणाऱ्या खेळाडूंपैकी आहे. न्यूट्रीशन आणि नियम या बाबतींत तो काटेकोर आहे. त्याने आपल्या आयुष्यात अनेक बदल केले असून, मी केवळ त्याला योग्य दिशेने कूच करण्यास मदत केली आहे,’’ असेही बासू यांनी सांगितेले.
नुकताच झालेल्या आयपीएलमधील कोहलीच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, ‘‘कोहलीने एकदा आपल्या खेळाविषयी म्हटले होते, की तो इतर खेळाडूंसारखे षटकार मारू शकत नाही. यंदाच्या आयपीएलवर नजर टाकल्यास त्याने ३८ षटकार मारले असून, गेल्या स्पर्धेच्या तुलनेत यंदा १५ षटकार अधिक मारले आहेत. यावरून त्याच्या अंगी असलेल्या ताकदीचा अंदाज येतो. ज्या वेळी कोहली आरसीबीसह जोडला गेला, त्या वेळेपासून तो आपल्या तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेत आहे.’’ (वृत्तसंस्था)
आजच्या काळातील युवा क्रिकेटर फॉलोअपवर अधिक भर देतात. एके काळी क्रिकेटर काही मस्ती-मजा करायाचे; मात्र सगळेचे असे नव्हते. अनेक क्रिकेटपटू शिबिर झाल्यानंतर फॉलअपविषयी चर्चा करतात; त्यामुळे मला अधिक मेहनत घ्यावी लागते, असे मला अजिबात वाटत नाही. याचे सर्व श्रेय भारतीय क्रिकेटरना जाते. कारण, जी ‘भूक’ मी भारतीय क्रिकेटरमध्ये पाहिली आहे, ती अविश्वसनीय आहे.
- शंकर बासू