विराटकडे ‘पूर्णवेळ’ नेतृत्व येणार
By admin | Published: January 6, 2017 01:17 AM2017-01-06T01:17:42+5:302017-01-06T01:43:56+5:30
इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील.
मुंबई : इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील. कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहली याच्याकडे दोन्ही प्रकाराचे नेतृत्वदेखील सोपविले जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. कोहलीकडे नेतृत्व सोपविले जाण्याबाबत कुठलीही शंका नाही; पण निवड करताना संघातील संतुलन राखण्याचे अवघड आव्हान समितीपुढे असेल. अनेक खेळाडू जखमांनी त्रस्त आहेत. मुंबईचे दोन्ही फलंदाज रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे बाहेर आहेत. यामुळे खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या शिखर धवनला के. एल. राहुलसोबत सलामीला पाठविले जाऊ शकते. याशिवाय एकदम नव्या चेहऱ्यावरदेखील विश्वास टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकचा राहुल जखमी झाल्याने न्यूझीलंड विरुद्ध तो खेळू शकला नव्हता. धवन आॅस्ट्रेलियात अखेरचा वन-डे खेळला होता. पहिल्या दोन्ही सामन्यांत ‘फ्लॉप’ राहिल्यानंतर पुढील तीन सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली होती. इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक झळकविणारा करुण नायर याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी दिली जाईल, असे संकेत आहेत.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जखमी झालेला आश्विन तमिळनाडूकडून रणजी सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या उपलब्धतेबाबतही अनिश्चितता आहे. अखेरच्या कसोटीत जखमी झालेला आॅफ स्पिनर जयंत यादव याचे नाव संघात येण्याआधी फिटनेस चाचणी होईल का, हे पाहणे रंजक ठरेल. मोहम्मद शमी आणि धवल कुलकर्णी हे देखील जखमी आहेत.
धोनी नेतृत्वाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांची नावे संघात निश्चित मानली जात आहेत. हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. तो आता डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत खेळत आहे. त्यालादेखील संघात स्थान मिळू शकते.
सुरेश रैनावर निवडकर्ते विश्वास दाखवितात काय, हे देखील पाहावे लागेल. तो फिट झाल्यानंतरच संघात राहू शकेल. १० आणि १२ जानेवारीला ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन सराव सामन्यांचे आयोजन होत आहे. त्यासंदर्भात भारतीय ‘अ’ संघदेखील निवडला जाईल. बैठकीबाबत अधिकृत माहिती देताना बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी म्हणाले. ‘सचिवाचे स्थान रिक्त असल्याने मी स्वत: शिर्के यांचे स्थान घेऊ शकतो.’ इंग्लंड संघाचे रविवारी भारतात आगमन होत आहे. ख्रिसमसनिमित्त हा संघ मायदेशी परत गेला होता.
धोनीची जागा घेण्यास कोहली निर्णय सज्ज
नवी दिल्ली : कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा महेंद्रसिंग धोनीने घेतलेला निर्णय कर्णधारपदाचा राजीनामा योग्य वेळी दिला. कारण कर्णधार म्हणून विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य करतानाच त्यांनी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात येणार असल्याचेही संकेत दिले. धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याबद्दल प्रसाद म्हणाले की, ‘जर धोनीने एक वर्ष किंवा सहा महिने आधी निर्णय घेतला असता तर मी चिंतेत पडलो असतो; पण त्याने योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्याला जाणीव आहे की, कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे आणि कर्णधार म्हणून तो चांगली कामगिरी करीत आहे.’