विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

By admin | Published: June 19, 2017 12:52 AM2017-06-19T00:52:57+5:302017-06-19T00:52:57+5:30

शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली

Viratasena got a lot of confidence! | विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

विराटसेनेला फाजील आत्मविश्वास नडला!

Next

बाळकृष्ण परब, ऑनलाइन लोकमत
शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फॉर्मने दगा दिला, नशिबानं साथ सोडली. अन् नजरेसमोर असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी आपण गमावली. बेभरवशाचा आणि धोकादायक असलेल्या पाकिस्तानी संघाने आपल्याला धोबीपछाड दिला. कुणाच्या ध्यानिमनी नसलेला पाकिस्तानी संघ खेळाच्या तिन्ही क्षेत्रात आपल्याला वरचढ ठरला. पाकिस्तानला हरवूच असा विश्वास असल्याने सेलिब्रेशनची जंगी तयारी झाली होती, पण घात झाला. संपूर्ण देश दुःखात बुडाला. अंतिम लढतीत पराभव, तोही पाकिस्तानकडून स्वीकारावा लागल्याने हा पराभव जिव्हारी लागलाय.
भारत ही लढत पराभूत होऊ शकतो, असे कुणाच्या मनातही आले नसेल,पण विराटसेनेसाठी या लढतीत काहीच चांगले झाले नाही. अंतिम लढतीपूर्वी आपला आत्मविश्वास शिखरावर होता. संपूर्ण संघात चिंता करावी अशी काहीच गोष्ट नव्हती. नाणेफेकीचा कौलही आपल्या बाजूने लागला. इथपर्यंत सारे काही आलबेल होते. पण पुढे भारतीय खेळाडू काहीसे बेफिकीरपणे खेळले. त्यात बुमराहच्या गोलंदाजीवर फकर जमानला नोबॉलमुळे जीवदान मिळाले आणि आपले नशीब फिरले. नोबॉल पडले, गोलंदाजी स्वैर झाली. फलंदाजी करताना चुकीच्या वेळी विकेट पडल्या. ओव्हलच्या खेळपट्टीत चिंता करण्यासारखे काहीच नव्हते. पण फलंदाजीतील अतिआत्मविश्वास नडला. मग एक दोन विकेट पडताच धावांच्या दबावासमोर आपले फलंदाज कोलमडले. सुरुवातीलाच सेनापती धारातीर्थी पडल्यावर आपल्या फलंदाजांनी हरी ओम विठ्ठला म्हणत खेळपट्टी ते पॅव्हेलियनची वारी सुरू केली. फटकेबाजी करत असलेल्या पांड्याला जडेजाने सात जन्माचे वैर असल्यासारखे धावचीत करून घातले.
बाकी पाकिस्तानने फायनलमध्ये चांगला खेळ केला. त्यांची क्षमता जोखण्यात आपण कमी पडलो. ते या लढतीत फेवरेट नव्हते, त्यामुळे बिनधास्त खेळले. त्यांचा फकर जमान मियाँदादची बॅट घेऊन आल्यासारखा खेळला, तर मोहम्मद आमीरच्या भन्नाट स्पेलने अक्रम, वकारच्या स्पेलची आठवण ताजी केली. पाकिस्तानी खेळाडू भारताविरुद्ध जिद्दीने खेळतात, हे आज त्यांनी पुन्हा एटदा दाखवून दिले. यात विशेष कौतुक करावे लागेल ते पाकिस्ताचा कर्णधार सर्फराझ अहमदचे. सलामीलाच भारताकडून हरल्यावर त्याने संघाला उभारी दिली. गरज असताना स्वतःही चांगली फलंदाजी केली. डीआरएसचा चातूर्याने वापर केला आणि अखेर पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला.
आजच्या सामन्याने अधोरेखित केलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये खेळापेक्षा मोठा कुणीच होऊ शकत नाही. तुम्ही कुणाला गृहित धरू शकत नाही आणि अमकाच संघ जिंकेल, असे छातीठोकपणे सांगू शकत नाही. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळला. पण आजचा दिवस आपला नव्हताच. आपण आज हरलो म्हणून आपल्या खेळाडूंवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. खेळ आहे, जय-पराजय काय होतच राहतील. सध्या गरज आहे ती विराटसेनेला साथ देण्याची.

Web Title: Viratasena got a lot of confidence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.