टीम इंडियाच्या उंचावलेल्या क्षेत्ररक्षणाचे श्रेय विराटला : श्रीधर
By admin | Published: December 17, 2015 01:30 AM2015-12-17T01:30:03+5:302015-12-17T01:30:03+5:30
संघाच्या सराव सत्रामध्ये क्षेत्ररक्षण अनिवार्य करून दररोज खेळाडूंना मैदानात घाम गाळायला लावणाऱ्या टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारामुळे संघाचे क्षेत्ररक्षण उंचावले आहे. त्यामुळे
चेन्नई : संघाच्या सराव सत्रामध्ये क्षेत्ररक्षण अनिवार्य करून दररोज खेळाडूंना मैदानात घाम गाळायला लावणाऱ्या टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारामुळे संघाचे क्षेत्ररक्षण उंचावले आहे. त्यामुळे संघाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे श्रेय कर्णधाराला द्यायलाच हवे, अशा शब्दांत टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी विराट कोहलीचे कौतुक केले.
श्रीधर यांनी सांगितले, की श्रीलंका दौऱ्याआधी कोहलीने सर्वांना आदेश दिले होते, की नेहमीच्या सरावासह प्रत्येक खेळाडू दररोज किमान २० मिनिटे क्षेत्ररक्षणाचा सराव करेल. अचूक झेल टिपण्याचा सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. विशेष म्हणजे कोहलीची ही रणनीती सिद्ध झाली आणि आता प्रत्येक खेळाडू २० मिनिटांहून अधिक वेळ क्षेत्ररक्षणाचा सराव करतो.
मागील काही महिन्यांपासून भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमालीचे उंचावले आहे. पूर्वीच्या तुलनेत आज भारतीय खेळाडू सूर मारून चेंडू सहजपणे झेलतात किंवा अडवतात. यामुळे भारतीय क्रिकेटसाठी हे सकारात्मक संकेत आहेत. श्रीलंका आणि नुकताच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले होते.(वृत्तसंस्था)