विराटचा वेग ‘फॉर्म्युला वन’च्या तोडीचा

By admin | Published: April 27, 2016 05:33 AM2016-04-27T05:33:35+5:302016-04-27T05:33:35+5:30

विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे.

Virat's breakthrough 'Formula One' breaks | विराटचा वेग ‘फॉर्म्युला वन’च्या तोडीचा

विराटचा वेग ‘फॉर्म्युला वन’च्या तोडीचा

Next

नवी दिल्ली : नवा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख निर्माण करणारा विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात ज्या वेगाने तो धावा फटकावत आहे ते बघता या स्पर्धेत तो नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पाच सामन्यांत ९१.७५ च्या सरासरीने आणि १४३.९२ च्या स्ट्राईक रेटने ३६७ धावा फटकावल्या आहेत. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर असून सध्या त्याच्याकडे ‘आॅरेंज कॅप’आहे.
बांगलादेशच्या यजमानपदाखाली ढाकामध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत विराटने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावांच्या खेळी केल्या. भारताने आशिया कप स्पर्धेत जेतेपद पटकावले. विराटला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेदरम्यान विश्रांती देण्यात आली होती. पण त्यानंतर झालेल्या विश्वकप स्पर्धेत त्याने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ धावांच्या खेळी केल्या. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. या कामगिरीमुळे विराट विश्वकप स्पर्धेत ‘प्लेअर आॅफ द टुर्नामेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरला.
विश्वकप स्पर्धेत फॉर्म विराटने आयपीएल स्पर्धेतही कायम राखला. २४ एप्रिल रोजी राजकोटमध्ये गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीत त्याने नाबाद १०० धावांची खेळी करताना टी-२० कारकिर्दीत प्रथमच शतक झळकावले. विराटचा फॉर्म बघता आयपीएलमध्ये एका सत्रात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम तो नोंदवेल, अशी आशा आहे. विराटला या वेळी त्याचा संघसहकारी ख्रिस गेल व चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करणारा मायकल हसी यांचा आयपीएलच्या एका मोसमात ७३३ धावा फटकावण्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेलने २०१२ मध्ये एका मोसमात १५ सामन्यांत ७३३ धावा फटकावल्या होत्या, तर हसीने २०१३ मध्ये १७ सामन्यांत ७३३ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये विराटची वैयक्तिक कामगिरी १६ सामन्यांत ६३४ धावा फटकावण्याची आहे. त्याने ही कामगिरी २०१३ मध्ये केली होती.
>विराटने आयपीएलच्या पाच सामन्यांत ७५, ७९, ३३ आणि १०० अशा धावा फटकावल्या आहेत. विराटने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तीन टी-२० सामन्यांत सलग अर्धशतके झळकावली. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने प्रथमच आॅस्ट्रेलियात ३-० ने क्लीन स्वीप दिला. आॅस्ट्रेलियात त्याने नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० अशा धावा फटकावल्या.
>२०१६ च्या सुरुवातीच्या चार महिन्यांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
१३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा फटकावल्या आहेत. त्यात ७ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. ३६७ आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याने पाच सामन्यांत ३६७ धावा फटकावल्या आहेत. यंदा टी-२० मध्ये त्याने एकूण १८ सामन्यांत ९९२ धावा फटकावल्या आहेत.

Web Title: Virat's breakthrough 'Formula One' breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.