विराटचे शतक; भारत मजबूत स्थितीत

By admin | Published: October 9, 2016 04:55 AM2016-10-09T04:55:31+5:302016-10-09T04:55:31+5:30

कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध शनिवारपासून प्रारंभ झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात दिवसअखेर ३ बाद २६७

Virat's century; India is in a strong position | विराटचे शतक; भारत मजबूत स्थितीत

विराटचे शतक; भारत मजबूत स्थितीत

Next

इंदूर : कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध शनिवारपासून प्रारंभ झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात दिवसअखेर ३ बाद २६७ धावांची मजल मारली.
तीन सामन्यांच्या मालिकेत उभय संघांतर्फे हे पहिले शतक आहे. अजिंक्य रहाणेने त्याची योग्य साथ देताना नाबाद ७९ धावा केल्या आहेत. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५४ षटकांत १६७ धावांची अभेद्य भागीदारी करीत डाव सावरला. त्याआधी, भारताची ३६ षटकांत ३ बाद १०० अशी स्थिती होती.
कोहलीने १९१ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार ठोकले, तर रहाणेने १७२ चेंडूंमध्ये ९ चौकार व १ षटकार लगावला.
कोहलीने एकेरी धाव घेत शतक पूर्ण केले. त्या वेळी तो दुसऱ्या टोकावर धावबाद होण्यापासून बचावला. तिसऱ्या पंचाने नाबाद ठरविल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोष करीत विराटच्या शतकाचे स्वागत केले.
दरम्यान, दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करीत असलेल्या गौतम गंभीरने (२९) शानदार सुरुवात करताना मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर दोन षटकार लगावले, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. मुरली विजयला (१०) जीतन पटेलने झटपट माघारी परतले, तर चेतेश्वर पुजाराला (४१) मिशेल सँटेनरने तंबूचा मार्ग दाखवला.
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. उभय संघांनी
प्रत्येकी दोन बदल केले. भारताने दुखापतग्रस्त शिखर धवन व
भुवनेश्वर कुमार यांच्या स्थानी
गौतम गंभीर व उमेश यादव यांना संधी दिली, तर न्यूझीलंड संघात हेन्री निकोल्सच्या स्थानी कर्णधार विल्यम्सन परतला, तर जिमी निशामला नील वॅगनरच्या स्थानी संधी देण्यात आली.
(वृत्तसंस्था)

सकारात्मक फलंदाजी करण्यावर लक्ष : पुजारा
वेगाने धावा फटकावण्यात अपयशी ठरत असल्यामुळे होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करीत भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटपेक्षा सकारात्मक असणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता.
नाबाद शतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली व नाबाद अर्धशतक झळकावणारा अजिंक्य रहाणे भारताचे ‘हीरो’ ठरले. सामन्यात स्ट्राईक रेटवर अधिक लक्ष देण्यापेक्षा सकारात्मक असणे आवश्यक असते.

नंबर गेम...
१७ डावांतील मायदेशात आलेले अपयश विराटने दूर केले. शनिवारी त्याने नाबाद १०३ धावा केल्या. या आधी त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी, २०१३ मध्ये मायदेशात शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर मागच्या १७ डावांतील त्याचे हे पहिलेच शतक आहे. कोहलीने त्याच्या मायदेशातील कसोटी सामन्यांत पहिल्या १३ डावांत ३ शतके झळकावली होती. या कसोटी मालिकेतील त्याचे हे पहिलेच शतक आहे.
२०१० मध्ये हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान हे कसोटीसाठी नव्याने नावारूपाला आले. त्या वेळी सुद्धा न्यूझीलंड संघ भारतीय दौऱ्यावर होता. आता इंदोर येथील होळकर स्टेडियम हे भारतातील २२ वे कसोटी मैदान म्हणून नावारूपाला आले.
४९ डावांत अजिंक्य रहाणे याने कसोटी कारकिर्दीतील २ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने दुसऱ्या १ हजार धावा या २४ डावांत पूर्ण केल्या. २ हजार धावा पूर्ण करणारा तो ३६ वा भारतीय खेळाडू ठरला. सरासरीनुसार
२ हजार धावा पूर्ण करणारा रहाणे हा चौथा सर्वाेत्कृष्ट फलंदाज आहे.
२००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद येथे भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने नाबाद शतक ठोकले होते. २००३ पासून गेल्या १३ कसोटी सामन्यांत न्यूझीलंडविरुद्ध धोनीने सहा अर्धशतके झळकाविली. तर न्यूझीलंडच्या कर्णधारांनी भारताविरुद्ध चार शतके ठोकली.
०३ भारतीय कर्णधारांनी कोहलीपेक्षा अधिक शतके झळकाविली आहेत. जानेवारी २०१५ पासून धोनीकडून कर्णधारपद मिळाल्यानंतर कोहलीने सहा शतके ठोकली आहेत. सुनील गावस्करने (११ शतके), मोहम्मद अझरुद्दिन (९) आणि सचिन तेंडुलकर (७) यांचा त्यात समावेश आहे. सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांनी प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत. सरासरीनुसार सर्वात वेगवान शतके झळकावणारा कोहली हा पहिला कर्णधार आहे.

दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना लवकर बाद करून सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. भारताच्या धावा रोखून धरण्यात यशस्वी ठरलो. खेळपट्टीकडून फारशी मदत मिळताना दिसत नाही. वेगवान गोलंदाजांना तर या खेळपट्टीवर चेंडू स्विंग करताना फारच कष्ट उपसावे लागले. अजिंक्य आणि विराटने आमच्यावर वर्चस्व मिळविले; पण आम्ही त्यांना झटपट बाद करण्याचा प्रयत्न करू.
- जिम्स निशाम, अष्टपैलू खेळाडू

धावफलक
भारत पहिला डाव : मुरली विजय झे. लॅथम गो. पटेल १०, गौतम गंभीर पायचित गो. बोल्ट २९, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. सेंटेनर ४१, विराट कोहली खेळत आहे १०३, अजिंक्य रहाणे खेळत आहे ७९, अवांतर : ५, एकूण : ९० षटकांत ३ बाद २६७ धावा. गडी बाद क्रम : १/२६, २/६०, ३/१००. गोलंदाजी : बोल्ट १६-२-५४-१, हेन्री २०-३-६५-०, पटेल २४-३-६५-१, सेंटेनर १९-३-५३-१, निशाम ११-१-२७-०.

Web Title: Virat's century; India is in a strong position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.