विराटचा फॉर्म संघासाठी निर्णायक ठरणार
By admin | Published: June 1, 2017 12:29 AM2017-06-01T00:29:25+5:302017-06-01T00:29:25+5:30
क्रिकेटची एक शानदार स्पर्धा सुरू होत आहे. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण प्रदेशात स्पर्धा खेळविली जात आहे. इंग्लंडमधील
- सौरभ गांगुली -
क्रिकेटची एक शानदार स्पर्धा सुरू होत आहे. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण प्रदेशात स्पर्धा खेळविली जात आहे. इंग्लंडमधील हवामान गेल्या काही दिवसांपासून प्रसन्न असल्याने या स्पर्धेचा साक्षीदार या नात्याने मी उत्साही बनलो. मी समालोचक या नात्याने स्पर्धेत पुनरागमन करणार. आगामी काही दिवसांसाठी रोमहर्षक खेळाचा आनंद उपभोगण्याची आम्हा सर्वांना संधी मिळणार, अशी खात्री वाटते.
अलीकडे उल्लेखनीय सुधारणा करणारे चांगले संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी तर २०१३ च्या स्पर्धेपासून वेगवान सुधारणा केली. इंग्लंडमध्ये यंदा खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या असतील. त्यामुळे प्रत्येक संघ दावेदार या नात्याने स्पर्धेत खेळताना दिसेल.
भारताने सराव सामन्यात धडाका केला. विशेषत: गोलंदाजी अधिक भेदक जाणवली. सर्व पाचही गोलंदाज पूर्णपणे लयीमध्ये असून आयपीएलसारख्या दीर्घ स्पर्धेत खेळूनही कुणाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही. इंग्लंडमधील हवामान देखील खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यास उपयुक्त आहे. भारतासाठी फलंदाजी मोलाची ठरावी. विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसतो. त्याचा हा फॉर्म भारतीय संघाचे स्पर्धेतील भविष्य निश्चित करणार आहे. व्यवस्थापनाला मात्र फलंदाजीतील चौथ्या स्थानावर काही सुधारणा करावी लागेल. युवराजची तब्बेत ठिक नाही. पण बांगला देशविरुद्ध तो मधल्या फळीत खेळला असता तर बरे झाले असते. तरीही पाकविरुद्ध सलामी लढतीआधी फिटनेस सिद्ध करण्याची त्याच्याकडे पुरेशी संधी असेल. दिनेश कार्तिक देखील उत्तम फॉर्ममध्ये आहे. तरीही टीम इंडियाच्या थिंक टँकची युवीला पसंती असेल कारण तो ‘मॅचविनर’ आहे.’
इंग्लंडने द. आफ्रिकेत झालेल्या तीन वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शानदार खेळ केला. तिसऱ्या सामन्यात मात्र फलंदाजी ढेपाळली. तथापि यजमान संघाला स्पर्धेपूर्वी तयारीसाठी चांगली संधी मिळाली असे म्हणावे लागेल. आयपीएलचा हिरो असलेला बेन स्टोक्स जबर फॉर्ममध्ये आहे. त्याची फलंदाजी देखील ताकदवान आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीवर इंग्लिश व्यवस्थापन खूश असावे. पाकिस्तान संघाच्या कामगिरीकडे अनेकांच्या नजरा असतील. विश्वस्तरावरील स्पर्धेत पाकने भारताविरुद्ध मात्र नेहमीच संघर्ष केला. यावेळी इभ्रत शाबूत राखण्यासाठी पाकला देखील कामगिरी सुधारणे क्रमप्राप्त झाले आहे. (गेमप्लान)