विराटसेनेचेच पारडे जड

By admin | Published: June 8, 2017 07:11 AM2017-06-08T07:11:24+5:302017-06-08T07:11:24+5:30

पाकिस्तानविरुद्घची बहुचर्चित आणि दबाव आणणारी लढत सहज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाला वेध लागले आहेत

Viratseenache parade heavy | विराटसेनेचेच पारडे जड

विराटसेनेचेच पारडे जड

Next
>बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत 
पाकिस्तानविरुद्घची बहुचर्चित आणि दबाव आणणारी लढत सहज खिशात घातल्यानंतर भारतीय संघाला वेध लागले आहेत ते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवल्यापासूनच जबरदस्त खेळ करत असल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींनाही आता चॅम्पियन्स ट्रॉफी आपलीच असल्याचे स्वप्न पडू लागले आहे. मात्र "मंझिल अभी दूर है"  याची जाणीव भारतीय संघाला ठेवावी लागेल, भारतीय संघातील व्यावसायिकता पाहता ही जाणीव असेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. 
बाकी दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता श्रीलंकन संघ म्हणजे बलाढ्य भारतीय संघासाठी काही बिजगणित किंवा भूमितीचा पेपर नक्कीच नाही. पहिल्या लढतील समोर आलेला पाकिस्तानचा संघ जर इतिहासाचा पेपर असेल तर श्रीलंकेचा संघ म्हणजे फार तर भूगोलाचा पेपर. मुरलीधरन, संगकारा, जयवर्धने निवृत्त झाल्यानंतर निर्माण झालेली पोकळी या संघाला अद्याप भरून काढता आलेली नाही. त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. अँजेलो मॅथ्युज आणि लासिथ मलिंगासारखे अनुभवी गडीही आहेत, पण काही वर्षांपूर्वीच्या श्रीलंकन संघासारखा दबदबा त्यांना दाखवता आलेला नाही. सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांचा खेळ डळमळीत झाला होता. गेल्या काही वर्षांत श्रीलंकेला भारताविरुद्ध म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. हीसुद्धा आपल्यासाठी जमेची बाजू ठरेल.
बाकी भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजांची भट्टी छान जमून आली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनने सलामीच्या लढतीतच शतकी भागीदारी केल्याने विराटच्या डोक्यावरील फार मोठी चिंता दूर झाली आहे. या दोघांचाही फॉर्म असाच कायम राहावा म्हणून त्याने देवाला नवसही बोलल्याची चर्चा आहे. तर युवराजच्या खेळीने त्याच्या तारुण्यातील आठवणी जागवल्यात. भुवनेश्वर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह वगैरे मंडळी इंग्लिश भूमीत बळीचा बोनस अधिकाधिक लुटण्याच्या इराद्याने खेळत आहेत. त्यामुळे या  मंडळींसमोर श्रीलंकन संघ जिंकला तर ते आश्चर्यच म्हणावे लागेल.
पण लंकेविरुद्ध मैदानात उतरल्यावर विराटसेनेला एक डोळा आकाशाकडे ठेवावा लागेल. कारण इंग्लंडमधला पाऊस एखाद्या चंचल प्रेयसीसारखा असल्याने त्याचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही. बरं एकवेळ प्रेयसीला समजावता येईल, पावसाला काय समजावणार? बाकी पावसाची मर्जी राहिली आणि नेहमीप्रमाणे आपली फलंदाजी बहरली तर विराटसेना सेमी फायनलचं तिकीट आजच कन्फर्म करेल, यात शंका नाही.

Web Title: Viratseenache parade heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.