CoronaVirus News: ...तर निवृत्तीचा विचार करावा लागेल- वीरधवल खाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:07 AM2020-06-15T05:07:02+5:302020-06-15T05:08:09+5:30
सरावाला विलंब होत असल्यामुळे त्रस्त
नवी दिल्ली : कोविड-१९ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निर्बंधांमुळे जलतरण केंद्र यापुढेही बंद राहणार असतील तर खेळातून निवृत्ती स्वीकारण्याचा विचार करू शकतो, असे मत सरावाची संधी मिळत नसल्यामुळे त्रस्त असलेला आशियन गेम्समधील कांस्यपदक विजेता जलतरणपटू वीरधवल खाडेने रविवारी व्यक्त केले.
खाडेने टिष्ट्वट केले की, सरावाला सुरुवात करण्यास उशीर होत असल्यामुळे टोकियो आॅलिम्पिकपूर्वी भारतीय खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. त्याने आपले टिष्ट्वट क्रीडा मंत्री किरण रिजिजू व भारतीय जलतरण महासंघालाही टॅग केले आहे.
भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) क्रीडा परिसराच्या आतील जलतरण केंद्र सुरू करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाला गृह मंत्रालयाकडून परवानगी घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे अव्वल जलतरणपटूंना आपला सराव सुरू करता येईल. एसएफआयच्या मते, एलिट जलतरणपटूंसाठी जलतरण केंद्र उघडणे गृह मंत्रालयाच्या दिशानिर्देशांमध्ये म्हटल्याप्रमाणे मनोरंजनासाठी जलतरणांतर्गत येत नाही. (वृत्तसंस्था)
भारतात जलतरण केंद्र का सुरू झाले नाही?
थायलंड, आॅस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी आपले जलतरण केंद्र सुरू केले असून, जलतरणपटूंना सरावाची परवानगी दिली आहे. पण भारतात गृह मंत्रालयाने लॉकडाऊन शिथिल करण्याची घोषणा केली. पण कोविड-१९ महामारीचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे जलतरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली नाही. दरम्यान, गृह मंत्रालयाने प्रेक्षकांविना स्टेडियम उघडण्याची परवानगी दिलेली आहे आणि आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या अनेक खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केलेली आहे.
जलतरणाला पुन्हा सुरुवात करण्याबाबत कुठले वृत्त आलेले नाही. जलतरणाचाही अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणे विचार व्हायला हवा. भारतात जलतरणपटूंना जलतरण तलावामध्ये उतरून जवळजवळ तीन महिन्याचा कालावधी झाला आहे. जर अन्य खेळांचे खेळाडू सरावादरम्यान फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करू शकतात तर जलतरणपटूही ते करू शकतात. आॅलिम्पिकमध्ये जलतरणातील अन्य संभाव्य दावेदार या कारणामुळे निवृत्तीबाबत विचार करणार नाही, अशी आशा आहे.
- वीरधवल खाडे