वीरेंद्र सेहवागच्या निवृत्तीचे संकेत...
By admin | Published: October 20, 2015 12:57 AM2015-10-20T00:57:05+5:302015-10-20T00:57:05+5:30
क्रिकेट जगतातील कोणत्याही गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखून असलेल्या भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत
दुबई : क्रिकेट जगतातील कोणत्याही गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखून असलेल्या भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. भारतात जाऊन अधिकृतरीत्या घोषणा करणार असल्याचे खुद्द सेहवागनेच दुबई येथे झालेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या लाँचिंग दरम्यान स्पष्ट केले.
सोमवारी रात्री सेहवागच्या निवृत्ती बाबत वावड्या उठल्यानंतर स्वत: सेहवागने या वृत्ताचे खंडन केले. मंगळवारी ‘वीरु’चा ३७ वाढदिवस आहे. पुढीलवर्षी होणाऱ्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये सहभागी होण्याचा त्याने इरादा स्पष्ट केला. वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवृत्तीनंतर सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुबई येथे मास्टर्स लीग स्पर्धेशी जुळण्याआधी सेहवागने निवृत्ती बाबत संकेत दिले. निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी असलेल्या या स्पर्धेत खेळण्याची इच्छा असलेल्या सेहवागच्या भारतीय संघातील पुनरागमनाची शक्यता धूसरच आहे. मास्टर्स चॅम्पियन लीगच्या लाँचिंग प्रसंगी सेहवाग वेस्ट इंडियच्या ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि इंग्लंडच्या अजहर मेहमूद या माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह उपस्थित होता. यावेळी सेहवागला या स्पर्धेत खेळण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सेहवागने स्पष्ट केले की, ही स्पर्धा निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंसाठी असून या स्पर्धेत खेळण्यासाठी मला आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हावे लागेल. भारतात परतल्यानंतर अधिकृतरीत्या मी माझ्या निवृत्तीबाबत घोषणा करेल. यानंतर क्रिकेटविश्वआत मोठी खळबळ माजली. (वृत्तसंस्था)
मी भारतात परतल्यानंतर निवृत्तीची अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगून सेहवाग म्हणाला,‘ निवृत्त झाल्यास दुबईतील मास्टर्स टी-२० लीग नक्की खेळेन. ’ ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीत रंगणार आहे. सध्या सेहवाग हरिणाकडून रणजी सामने खेळत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या सेहवागने अखेरचा कसोटी सामना मार्च २०१३ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादेत खेळला होता.