स्मृती मंधानाला "सेहवाग व्हर्जन" म्हणणा-या चाहत्याला विरूने सुनावलं
By Admin | Published: July 2, 2017 12:08 PM2017-07-02T12:08:22+5:302017-07-02T12:21:59+5:30
महिला विश्वचषक स्पर्धेत तडाखेबाज फलंदाजी करून स्मृती मंधाना नावाची एक नवी तारा उदयास आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - महिला विश्वचषक स्पर्धेत तडाखेबाज फलंदाजी करून स्मृती मंधाना नावाची एक नवी तारा उदयास आली आहे. स्मृती मंधानाच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर सात विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात स्मृतीने 108 चेंडूत 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकत नाबाद 106 धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातही तिने 90 धावांची शानदार खेळी केली होती. तेव्हापासून स्मृती मंधाना हे नाव क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
सोशल मीडियावर एका चाहत्याने स्मृती मंधानाची तुलना भारताचा माजी सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागसोबत केली. या चाहत्याने सेहवागला ट्विट करताना स्मृती मंधाना म्हणजे विरेंद्र सेहवागचं फिमेल व्हर्जन असून तुम्ही तिच्यावर गर्व करू शकतात असं म्हटलं. त्यावर आपल्या हटके ट्विटसाठी फेमस असलेल्या सेहवागने लागलीच त्या ट्विटर युझरला अनोख्या शैलीत उत्तर दिलं. "ती स्मृतीचंच पहिलं व्हर्जन आहे. प्रत्येक भारतीय ज्याला खेळामध्ये रस आहे त्या प्रत्येकाला तिचा अभिमान वाटेल. स्मृती आणि तिच्या संघाला शुभेच्छा" असं ट्वीट सेहवागने केलं.
काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने अशाच एका प्रश्नावरून पत्रकाराला खडेबोल सुनावले होते. त्यामुळे सेहवागने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
@mandhana_smriti is the Female version of @virendersehwag
— SPYder (@UrstrulyBharat_) June 30, 2017
You can be proud of her sir pic.twitter.com/wW8awyt9Ie
She is the first version of Smriti and is really special. Every Indian who loves sports will be proud of her. Wish her and the team the best https://t.co/RrjavFVLc0
— Virender Sehwag (@virendersehwag) June 30, 2017
काय म्हणाली होती मिताली राज-
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या महिला वर्ल्ड कप टुर्नामेंट अभियानापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोणता पुरूष क्रिकेटपटू आवडतो असं मिताली राजला एका पत्रकाराने विचारलं. या प्रश्नावर मिताली चांगलीच भडकली.
तुम्ही पुरूष क्रिकेट खेळाडूंनाही हाच प्रश्न विचारतात का? त्यांना कोणती महिला क्रिकेटपटू आवडते हे तुम्ही विचारतात का? मला सातत्याने हा प्रश्न विचारला जातो. तुम्ही पुरूष क्रिकेटपटूंनाही हा प्रश्न विचारायला पाहिजे असं उत्तर देऊन मितालीने पत्रकाराची बोलती बंद केली.
पुरूषांच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेमध्ये बराच फरक आहे यावरही मितालीने जोर दिला. आमचे सर्व सामने टीव्हीवर दाखवले जात नाहीत. मात्र बीसीसीआयने गेल्या दोन मालिकांचं टीव्हीवर प्रसारण करून चांगली सुरूवात केली असून त्याचा चांगला परिणामही झाला आहे. मात्र, अजून आम्हाला खरी ओळख मिळवायला वेळ लागेल,असं मिताली म्हणाली.
स्मृतीने 108 चेंडूत 13 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार ठोकत नाबाद 106 धावा ठोकल्या.