पुन्हा एकदा ‘आॅलिम्पियाड’ खेळण्यास उत्सुक : विश्वनाथन आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:15 AM2018-01-08T01:15:05+5:302018-01-08T01:15:35+5:30
‘मी १९८७ मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर झालो आणि आता भारतामध्ये ५० ग्रँडमास्टर आहेत. राखीव खेळाडू किंवा युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहिल्यास भारत जगातील एक मजबूत संघ आहे.
मुंबई : ‘मी १९८७ मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर झालो आणि आता भारतामध्ये ५० ग्रँडमास्टर आहेत. राखीव खेळाडू किंवा युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहिल्यास भारत जगातील एक मजबूत संघ आहे. त्यामुळे या सर्व खेळाडूंसाठी चांगल्या संधी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे नुकताच वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे जागतिक जेतेपद पटकावलेल्या विश्वनाथन आनंद याने सांगितले.
रविवारी झालेल्या तिस-या मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम दिवशी पारितोषिक समारंभाला उपस्थित असलेल्या आनंदने या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा जॉर्जिया येथे होणा-या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आनंद सहभागी होणार आहे. याआधी आनंदने २००६ मध्ये या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर तो पहिल्यांदाच खेळणार आहे. याविषयी विचारले असता आनंदने म्हटले, ‘नक्कीच भारताला या स्पर्धेत पदकाची आशा आहे. या स्पर्धेतील आघाडीच्या ५-६ संघामध्ये भारताचा समावेश आहे. तरी आॅलिम्पियाड स्पर्धेचे स्वरूप आणि स्विस फॉर्मेटमुळे छोटी चूकही महागात पडू शकते. नक्कीच आपल्या पदक जिंकण्याची संधी आहे, पण एक संघ म्हणून खूप गोष्टी साध्य कराव्या लागतील.’
सध्याच्या बुद्धिबळविषयी आनंदन म्हटले, ‘मी किशोरवयात असताना देशभरात सब-ज्युनिअर किंवा ज्युनिअर स्पर्धा खेळण्यासाठी टेÑनने प्रवास करायचो. नशिबाने मी वरिष्ठ पुरुष गटासाठी लवकर पात्रता मिळवली. सध्या आपल्याकडे युवा खेळाडूंची भक्कम फळी असून त्यांनी आपल्याहून सरस आणि मजबूत खेळाडूंविरुद्ध खेळण्याची परंपरा जपली आहे.’
नुकताच झालेल्या वर्ल्ड रॅपिड ब्लिट्झ स्पर्धेतील जेतेपदाविषयी आनंदने म्हटले, ‘खरं सांगायचं तर या स्पर्धेआधी झालेल्या रॅपिड स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी निराश होतो. मी जास्त रॅपिड स्पर्धा खेळलो नव्हतो, कारण मी क्लासिक प्रकारावर अधिक लक्ष केंद्रित
केले होते. त्यामुळे माझ्या खेळामध्ये थोडा बदलही झाला होता.
त्यामुळे मी प्रयत्न करण्याचे ठरवले होते आणि कुठे चुकतोय हे शोधायचा चंग बांधला. त्यामुळे मला पुनरागमनाची आशा वाटू लागली. मी अनेक रॅपिड स्पर्धा खेळण्याचे ठरवले आणि पहिल्याच स्पर्धेत विजेता ठरल्याचे माझ्यासाठीही आश्चर्याचे ठरले. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी नेमकं काय केले हे मलाही माहीत नाही.’
आॅलिम्पियाड खेळण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. स्पर्धेत पुनरागमन करीत पुन्हा एकदा येथे खेळायला मिळणार यामुळे मी खूश आहे. या स्पर्धेचे काही नियम मला आवडत नाही, पण असे असले तरी आम्ही एक संघ म्हणून सकारात्मकतेने आॅलिम्पियाडमध्ये खेळू. भारतीय संघातील सर्वच खेळाडू चांगले असून त्यांनी याआधी २०१४ आणि २०१६ मध्ये या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.