विश्वनाथन आनंदच्या जोरावर भारताची आगेकूच; आॅस्ट्रियाचा सहज पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:53 AM2018-09-27T03:53:45+5:302018-09-27T03:54:16+5:30
पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने जबरदस्त प्रदर्शन करीत मार्कस रॅगरचा पराभव केला. त्याच्या या विजयानंतर भारतीय पुरुष संघाने ४३ व्या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आॅस्ट्रियाचा ३.५-०.५ अशा फरकाने पराभव केला.
बातुमी (जार्जिया) - पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने जबरदस्त प्रदर्शन करीत मार्कस रॅगरचा पराभव केला. त्याच्या या विजयानंतर भारतीय पुरुष संघाने ४३ व्या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आॅस्ट्रियाचा ३.५-०.५ अशा फरकाने पराभव केला. १२ वर्षांनंतर आॅलिम्पियाड खेळत असलेल्या आनंदने मंगळवारी त्याच्यातील उत्कृष्ट क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली.
दुसऱ्या बोर्डवरील सामन्यात पी. हरिकृष्णाने वेलेंटाइन ड्रगनेव याच्या अखेरच्या क्षणी केलेल्या चुकांचा फायदा उठवत बाजी मारली. विदित गुजरातीने आंद्रियास डिरमेयरचा पराभव करीत भारताची आघाडी निश्चित केली होती. चौथ्या बोर्डवर बी. अधिबान आणि पीटर श्रेनर यांच्यातील सामना बरोबरीवर आटोपला. सलग दुसºया विजयानंतर भारतीय पुरुष संघाने ४० इतर संघासह संयुक्त आघाडी मिळवली. आता भारताचा पुढील सामना कॅनडाविरुद्ध होईल.
भारतीय महिला संघाने वेनेजुएला संघाचा ४-० ने पराभव केला. टॉप बोर्डवरील डी. हरिकाने सराई कारोलिना सांचेज कास्टिलाचा पराभव केला. दुसºया बोर्डवरील तानिया सचदेव हिने अमेलिया हर्नाडेज बोनिलाचा सहज पराभव केला. ईशा करवडे हिने तारुआ मॅनुएलविरुद्ध शानदार खेळ केला. तर राष्ट्रीय चॅम्पियन पद्मिणी राउतने कोराल्स पॅटिनो गर्सियाचा पराभव केला. या गटात ३३ संघ संयुक्तरित्या आघाडीवर आहेत. भारताचा आता सर्बियाविरुद्ध सामना होणार आहे. बुद्धिबळातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत दुसºया दिवशी उलटफेर पाहायला मिळाले. अव्वल मानांकन प्राप्त रशियाच्या महिला संघाला उज्बेकिस्तानच्या संघाने १.५-२.५ अशा फरकारने पराभूत केले. (वृत्तसंस्था)