जर्मनी, कोस्टारिका प्रशिक्षकांची ‘फातोर्डा’ला भेट
By admin | Published: July 10, 2017 01:19 AM2017-07-10T01:19:05+5:302017-07-10T01:19:05+5:30
भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे.
मडगाव : भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे. स्टेडियम आणि साधनसुविधांच्या पूर्वतयारीचा फिफा अधिकारी तसेच जर्मनी, कोस्टारिका आणि गिनी संघांच्या प्रशिक्षकांनी आढावा घेतला. त्यांनी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमला भेट दिली.
गिनी संघातर्फे सोलियामाने कामारा, फाह कोंदे, जर्मनी संघातर्फे मार्क फिश्चर, मार्कुस शेर्इंनवशि, प्रशिक्षक ख्रिस्तीयान व्युयेका तर कोस्टारिकाचे प्रशिक्षक ब्राइंन्से कामाचो व ख्रिस्तियान सालेस उपस्थित होते. इराणचा संघ एएफसी स्पर्धेतील सामने खेळत असल्याने त्यांचे पदाधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत.
येथील सुविधा समाधानकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्लेयर्स रूम, रेफ्री रुम, सामन्याच्या वेळील मैदान प्रवेशाची दिशा, आपत्कालीन सुविधा तसेच इतर सुविधांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. फिफाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, स्टेडियम सज्ज करण्यात येत आहे.
दरम्यान, फातोर्डा स्टेडियमवर ७ आॅक्टोबर रोजी जर्मनी-कोस्टारिका यांच्यात सायंकाळी ५ वाजता पहिला सामना, त्यानंतर रात्री ८ वाजता इराण वि. गिनी यांच्यात दुसरा सामना होईल. त्यानंतर १०, १३, १७ आॅक्टोबर रोजी सामने होतील. २१ आॅक्टोबर रोजी उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. मैदानावर ‘क’ गटातील सामने खेळविण्यात येतील. या गटात इराण , गिनी, जर्मनी आणि कोस्टारिका हे संघ आहेत. (वृत्तसंस्था)