विश्वनाथन आनंदचा चेहरा बुद्धिबळला अधिक बळ देईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 08:14 PM2021-01-10T20:14:56+5:302021-01-10T20:15:55+5:30
Viswanathan Anand News : नवनियुक्त एआयसीएफच्या सदस्यांनी आनंदची चेन्नईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्यापुढे सल्लागार मंडळात येण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास आनंदने होकार दिला
- सचिन कोरडे
पणजी - नावात बुद्धिबळाचे विश्व सामावून घेणारा पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद आता चेस फेडरेशन आफ इंडियात (एआयसीएफ) वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. नवनियुक्त एआयसीएफच्या सदस्यांनी आनंदची चेन्नईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्यापुढे सल्लागार मंडळात येण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास आनंदने होकार देत देशात बुद्धिबळाला अधिक बळ देण्याचे आश्वासन दिले. आनंदच्या या भूमिकेमुळे आता फेडरेशनचेही ‘बळ’ वाढले आहे. आनंद पहिल्यांदाच फेडरेशनच्या सल्लागार मंडळात सहभागी झालाय, हे उल्लेखनिय.
यासंदर्भात, अखिल भारतीय बुदिधबळ संघटनेचे महासचिव भारत सिंग चाैहान यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, हो... आम्ही विश्वनाथन आनंदची भेट घेतली. नवी समिती असल्याने त्यानेही आमचे अभिनंदन केले. तसेच बुद्धिबळासाठी आपण अधिक योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. सल्लागार मंडळाच्या प्रस्तावावर त्याने सकारत्मकता दाखवत लगेच तो स्वीकारला. आता आम्हालाही विश्वनाथन आनंदचे मार्गदर्शन तसेच सल्ला मिळणार आहे. आनंदच्या सहभागामुळे फेडरेशन देशात विविध उपक्रम राबवणार आहे. तसेच देशातील युवकांना प्रेरीत करण्यासाठी तसेच बुद्धिबळाकडे अधिक आकर्षित करण्यासाठी आनंद महत्वपूर्ण ठरेल.
ऑलिम्पिकमध्ये समावेशाचा प्रस्ताव
बुद्धिबळ या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा,यासाठी प्रस्ताव यापूर्वीच पाठविलेला आहे. यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुद्धा सुरु आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश झालेला आहे. आता ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, अशी आम्हाला आशा आहे. फेडरेशनचे गेल्या अनेक वर्षपासून प्रयत्न सुरू आहेत. याबाबतही आम्ही सकारात्मक आहोत, असे महासचिव भारत सिह चाैहान यांनी सांगितले.