विश्वनाथन आनंदचे जबरदस्त पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:08 AM2017-08-08T02:08:17+5:302017-08-08T02:08:35+5:30
भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या फॅबियानो कारुआना याला नमवून सिंक्यूफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर दुसरे स्थान पटकावले.
सेंट लुई (अमेरिका) : भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या फॅबियानो कारुआना याला नमवून सिंक्यूफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर दुसरे स्थान पटकावले. स्पर्धेतील पहिले ४ सामने बरोबरीत राखल्यानंतर आनंदने सर्वोत्तम खेळ करत जबरदस्त पुनरागमन केले.
आनंदने आपला उच्च दर्जा सिद्ध करताना अप्रतिम चाली रचून फॅबियानोला पराभव मान्य करण्यास भाग पाडले. आनंदने जबरदस्त वर्चस्व गाजवताना केवळ २९ चालींमध्ये बाजी मारली. या शानदार विजयानंतर आनंदने अव्वल स्थानी असलेल्या फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेव याच्यासमोर विजेतेपदासाठी तगडे आव्हान उभे केले आहे. लाग्रेवने आर्मेनियाच्या लेवोन आरोनियनसह लढत अनिर्णित राखत ३.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच वेळी, आनंद आणि नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन प्रत्येकी ३ गुणांसह संयुक्तपणे दुसºया स्थानी विराजमान आहेत. स्पर्धेत चौथ्या फेरीदरम्यान झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर पुनरागमन केलेल्या कार्लसनने अमेरिकेच्या वेस्लेला नमवले. तसेच, रशियाच्या इयान एन याने आपल्याच देशाच्या सर्जेई कर्जाकिन याला बरोबरी मान्य करण्यात भाग पाडले. (वृत्तसंस्था)