वानखेडेवर आज काँटे की टक्कर...

By admin | Published: May 10, 2015 04:30 AM2015-05-10T04:30:00+5:302015-05-10T04:30:00+5:30

सलग ५ विजय मिळवून तुफान फॉर्ममध्ये आलेले मुंबई इंडियन्स आज आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर तडाखेबंद रॉयल चँलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भिडेल.

Wankhede on today's thorn in th ... | वानखेडेवर आज काँटे की टक्कर...

वानखेडेवर आज काँटे की टक्कर...

Next

मुंबई : सलग ५ विजय मिळवून तुफान फॉर्ममध्ये आलेले मुंबई इंडियन्स आज आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर तडाखेबंद रॉयल चँलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भिडेल. स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय अनिवार्य असल्याने या वेळी क्रिकेटप्रेमींना काँटे की टक्कर पाहायला मिळेल.
मुंबईने शुक्रवारी बलाढ्य चेन्नईला धक्का देऊन चांगली लय मिळवली आहे. विशेष म्हणजे, हुकमी लसिथ मलिंगा संघाबाहेर असतानादेखील मुंबईने चेन्नईला मर्यादेत रोखण्याची कामगिरी केली होती. आजच्या बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मलिंगाचे पुनरागमन जवळ जवळ निश्चित असून चेन्नईविरुद्ध त्याच्या जागी खेळलेल्या मर्चंट डी लांगेला बाहेर बसावे लागेल.
फलंदाजीमध्ये मुंबईची स्थिती मजबूत दिसते. संघाचे दोन्ही सलामीवीर लेंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्यांची आक्रमक सुरुवात मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. शिवाय, कर्णधार रोहित शर्मा, अंबाती रायडू आणि किरॉन पोलार्ड यांची आक्रमकतादेखील प्रतिस्पर्ध्यांच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखून आहे. गोलंदाजीमध्ये मलिंगा आणि हरभजन यांच्याव्यतिरिक्त इतरांना म्हणावा तसा प्रभाव टाकण्यात अपयश आले. विनयकुमार, जगदीश सुचित आणि मिचेल मॅक्लेनघन यांच्यासमोर कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान असेल.
दुसऱ्या बाजूला बंगळूरूचा हुकमी गोलंदाज मिचेल स्टार्क जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यंदा सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकल्यानंतरही त्याने ७ सामन्यांत १६ बळी घेऊन आपली छाप पाडली. शिवाय, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेव्हीड वाइस (१० बळी) व फिरकीपटू युजवेंद्र चहल (१३ बळी) यांची कामगिरीदेखील बंगळुरूसाठी निर्णायक ठरत आहे.
फलंदाजीत आरसीबीचा आधारस्तंभ धडाकेबाज ख्रिस गेल हाच आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या गतसामन्यात गेलने वादळी ११७ धावांची खेळी साकारताना प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशाराच दिला. त्याच वेळी कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यावरदेखील संघाची मदार असेल. या तिघांनीही यंदाच्या सत्रात ३०० हून अधिक धावा कुटल्या आहेत. मात्र, हे तिघेही लवकर बाद झाल्यास बंगळुरूची फलंदाजी ढेपाळते, हे प्रतिस्पर्ध्यांना चांगले ठाऊक असल्याने मुंबईचे प्रथम लक्ष्य या त्रयीला रोखण्याचेच असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Wankhede on today's thorn in th ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.