वानखेडेची खेळपट्टी आपल्याला अनुकूल बनवू नका - आयसीसी
By admin | Published: March 30, 2016 01:38 PM2016-03-30T13:38:55+5:302016-03-30T13:46:26+5:30
मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मायदेशात खेळत असल्यामुळे उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आपल्याला अनुकूल खेळपट्टी बनवून घेऊ नये यासाठी आयसीसीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आयसीसीचे मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रमुख अँडी अॅटकीनसन यांनी वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफशी चर्चा केली आहे. कोणीही खेळपट्टी बनवताना प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर, लगेच मला कळवा असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
भारताने आतापर्यंतचे चारही सामने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळले आहेत. त्यामुळे भारताने प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पण या वर्ल्डकपमध्ये वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये धावांच्या राशी उभारल्या गेल्या. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचे २३० धावांचे लक्ष्य या मैदानावर पार केले.
विराट कोहलीचा अपवाद वगळता आधीच भारतीय फलंदाज फॉर्मसाठी चाचपडत आहेत. त्यामुळे फलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. उपांत्यफेरीचा सामना वानखेडेवरील दुस-या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रथमच या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे.
भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध येथे शेवटचा सामना झाला होता. ज्या सामन्यात आफ्रिकेने ४०० पेक्षा जास्त धावा कुटल्या होत्या. भारताने हा सामना गमावल्यामुळे त्यावेळी खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता.