‘आणखी चांगली कामगिरी करायचीय’
By admin | Published: July 1, 2017 02:12 AM2017-07-01T02:12:37+5:302017-07-01T02:12:37+5:30
जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.
टॉन्टन : जबरदस्त सूर गवसलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आणखी धावांची भुकेली असून, आपली ही सुरेख लय विश्वचषकातील उर्वरित सामन्यात कायम ठेवण्याची तिची इच्छा आहे.
विशेष म्हणजे डाव्या गुडघ्यावरील दुखापतीनंतर ती जानेवारीपासून एकही सामना खेळली नव्हती. तरीदेखील निवड समितीने या स्पर्धेसाठी स्मृती हिची निवड करून मोठा जुगार खेळला होता.
स्पर्धेच्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान स्मृती लयीत दिसली नव्हती; परंतु वर्ल्डकपच्या पहिल्या दोन सामन्यांत इंग्लंडविरुद्ध ९0 आणि वेस्ट इंडीजविरुद्ध १0६ धावांची खेळी करताना तिने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला.
महिला बिग बॅश लीगच्या २0१६-१७ या हंगामात ब्रिस्बेन हिटकडून खेळणाऱ्या स्मृतीने म्हटले, ‘अद्याप स्पर्धा संपलेली नाही; परंतु दुखापतीनंतर चांगले पुनरागमन केल्याने मी आनंदित आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यादरम्यान मला सूर गवसला नव्हता आणि मी खूप नर्व्हस होती. सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केल्यानंतर माझे फलंदाजीतील कौशल्य कायम आहे आणि मी फलंदाजी करू शकते हा आत्मविश्वास मिळाला. दुखापतीनंतर पुनरागमन करणे कठीण होते; परंतु आता मी खुश आहे. भारतासाठी दोन सामन्यांत मी चांगली कामगिरी केली आणि पुढेही अशीच लय कायम राहील, अशी आशा आहे.’ इंग्लंडमधील वातावरण स्मृतीच्या चांगलेच पथ्यावर पडते. येथे तिने २0१४ मध्ये अवघ्या वयाच्या १८ व्या वर्षीच भारताच्या कसोटी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही डावखुरी फलंदाज म्हणाली, ‘मला येथील वातावरण आवडते. मला थंड हवामानात खेळणे आवडते. त्यामुळे मला आतून आनंद मिळतो. ते चांगल्या खेळपट्ट्या तयार करतात. भारतातही मला खेळणे आवडते; परंतु येथे खेळणे जास्त आवडते. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करते. येथे टीव्ही नाही आणि लक्ष दुसरीकडे जाण्यासारखे येथे काही नाही. त्यामुळे मला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते.’
एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या सहा महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहणे हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी मोठा धक्का मानला जातो; परंतु स्मृतीने या वेळेचा उपयोग आपल्या फायद्यासाठी केला. पाकिस्तानविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यासंदर्भात ती म्हणाली, ‘मी अजिबात समाधानी नाही. गेली पाच महिने तंदुरुस्त होण्यासाठी मी एवढी मेहनत ९0 अथवा शतक करण्यासाठी घेतली नाही. मी भारतासाठी चांगली कामगिरी करू इच्छिते आणि भारतासाठी वर्ल्डकप जिंकू इच्छिते. मी पाच महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करीत आहे.’