दुसरा ‘फ्लार्इंग सिख’ पाहण्याची इच्छा : मिल्खा सिंग

By admin | Published: May 10, 2016 02:46 AM2016-05-10T02:46:40+5:302016-05-10T02:46:40+5:30

रोम आॅलिम्पिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही

Wanting to see another 'flying Sikh': Milkha Singh | दुसरा ‘फ्लार्इंग सिख’ पाहण्याची इच्छा : मिल्खा सिंग

दुसरा ‘फ्लार्इंग सिख’ पाहण्याची इच्छा : मिल्खा सिंग

Next

पुणे : रोम आॅलिम्पिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही, याची मला सारखी खंत वाटते आणि दु:ख होते. मी आता नव्वदीच्या घरात आहे. हे जग सोडण्यापूर्वी एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे. हा सुदिन उजाडण्याचीच मी वाट पाहत आहे, असे भावपूर्ण उद्गार ‘फ्लार्इंग सिख’ मिल्खा सिंग यांनी काढले.
कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पोचा (पीआयएसई) रविवारी समारोप झाला. यानिमित्त रिओ आॅलिंपिकसाठी स्पर्धकांना शुभेच्छा देण्याचा, तसेच यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. या वेळी मिल्खा यांनी आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना हेलावून सोडले. व्यासपीठावर विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे उपस्थित होते.
खेळाडूंना सल्ला देताना ते म्हणाले, की आमच्या पिढीने, तसेच पी. टी. उषा, अंजू जॉर्ज अशा खेळाडूंनी खूप मेहनत केली. आजच्या पिढीला मात्र झटपट यश हवे आहे आणि म्हणून अनेक जण ड्रग्ज घेतात, हे योग्य नाही. यामुळे अनेक स्पर्धांत आपली पदके काढून घेतली गेली. देशाची नाचक्की झाली. तरुण खेळाडूंनी ड्रग्जचा नव्हे, मेहनतीचा पर्याय निवडावा. पैशासाठी मॅच-फिक्सिंगही करू नये. फाळणीच्या रक्तरंजित इतिहासाचे साक्षीदार असलेल्या मिल्खा सिंग यांनी देशप्रेमाचा सल्ला दिला. जेथे जाल तेथे देशाचा लौकिक उंचावणारी कामगिरी करा. आपण फार मोठ्या संघर्षानंतर देश स्वतंत्र केला आहे. देशाच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.
मिल्खा यांच्या हस्ते रिओ आॅलिंपिकला पात्र ठरलेला मल्ल नरसिंग यादव, रोर्इंगपटू दत्तू भोकनाळ यांच्यासह ईशा करवडे, तेजस्विनी मुळे, बालकल्याण संस्थेची गौरी गाडगीळ, वैष्णवी जगताप, पॅरा खेळाडू माधवी लता, भरत चव्हाण, बालकल्याणचे प्रशिक्षक अभिजित तांबे, अशोक नांगरे, गजानन पाटील, प्रवीण ढगे, राजेंद्र सापटे, धीरज मिश्रा, दीपाली निकम, बीईजीचे जगन्नाथ लकडे, सी. प्रकाश, सागर ठाकूर, अँथनी दास परेरा, तसेच राजू दाभाडे, राहुल राणे यांचा सत्कार करण्यात आला.
नरसिंगने सांगितले, की रिओ आॅलिंपिकसाठी माझी चांगली तयारी सुरू आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हेच एकमेव ध्येय आहे. दत्तू म्हणाला, की आॅलिंपिक म्हणून वेगळी स्पर्धा असा माझा दृष्टिकोन नाही. महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करायची हाच निर्धार आहे. डॉ. विश्वजित कदम यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, की आपल्या देशाचे अनेक खेळाडू कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची
नसताना आणि उलट ती प्रतिकूल असताना यश मिळवित आहेत. अशा पराक्रमी खेळाडूंचा प्रातिनिधीक
सत्कार करणे हा पीआयएसईचा बहुमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Wanting to see another 'flying Sikh': Milkha Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.