‘ब्रॅडमन क्लब’मध्ये वॉर्नर

By admin | Published: January 4, 2017 03:28 AM2017-01-04T03:28:41+5:302017-01-04T03:28:41+5:30

डॉन ब्रॅडमननंतर कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी उपाहारापूर्वी शतक झळकावणाऱ्या आॅस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये मंगळवारी डेव्हिड वॉर्नरने स्थान मिळवले, तर त्याचा सलामीचा

Warner in 'Bradman Club' | ‘ब्रॅडमन क्लब’मध्ये वॉर्नर

‘ब्रॅडमन क्लब’मध्ये वॉर्नर

Next

सिडनी : डॉन ब्रॅडमननंतर कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी उपाहारापूर्वी शतक झळकावणाऱ्या आॅस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये मंगळवारी डेव्हिड वॉर्नरने स्थान मिळवले, तर त्याचा सलामीचा सहकारी मॅथ्यू रेनशॉने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. वॉर्नर व रेनशॉ यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात मंगळवारी पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३६५ धावांची मजल मारली.
डावखुरा फलंदाज वॉर्नरने कारकिर्दीतील १८ वे सिडनी क्रिकेट मैदानावरील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने केवळ ११७ मिनिटांमध्ये ७८ चेंडूंना सामोरे जाताना १७ चौकारांच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. उपाहारानंतर तो ९५ चेंडूंमध्ये ११३ धावा फटकावून बाद झाला.
वॉर्नरचा सहकारी २० वर्षीय रेनशॉ दिवसअखेर १६७ धावा काढून नाबाद आहे. त्याला दुसऱ्या टोकाकडून पीटर हॅड््सकाम्ब (नाबाद ४०) साथ देत आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची अभेद्य भागीदारी केली. रेनशॉने आतापर्यंत २७५ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार लगावले.
मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेणाऱ्या आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर व रेनशॉ यांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. या दोघांनी सलामीला १५१ धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्रात वॉर्नरने वर्चस्व गाजवले. त्याने उपाहारापूर्वी शतक झळकाविण्याचा इतिहास नोंदविला.
ब्रॅडमननंतर गेल्या ८७ वर्षांच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहारापूर्वी शतक झळकाविणारा आॅस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज ठरला. अशी कामगिरी करणारा तो आॅस्ट्रेलियाचा चौथा व जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. आॅस्ट्रेलियात प्रथमच कुठल्या फलंदाजाने अशी कामगिरी केली.
कारकिर्दीतील ५०वा कसोटी सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला मोठी खेळी करता आली नाही. २४ धावा काढून तो फिरकीपटू यासिर शाहचे (१-१३२) लक्ष्य ठरला. यॉर्कशायरमध्ये जन्मलेला रेनशॉ वैयक्तिक १३७ धावांवर असताना शाहच्या गोलंदाजीवर त्याला पायचित ठरविण्यात आले होते, पण त्याने रेफरलचा आधार घेतला. रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या बॅटला लागून गेल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)

- ब्रॅडमनने १९३०मध्ये लीड््समध्ये उपाहारापूर्वी १०५ धावा फटकावल्या. त्यावेळी त्यांनी ३३४ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याआधी व्हिक्टर ट्रंपरने १९०२ मध्ये मॅन्चेस्टरमध्ये १०३ आणि चार्ली मॅकार्टनीने १९२६ मध्ये लीड््सवर ११२ धावांची खेळी केली होती. या व्यतिरिक्त उपाहारापूर्वी शतक झळकावणाऱ्या अन्य फलंदाजांमध्ये केवळ पाकच्या माजिद खानचा समावेश आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध १९७६ मध्ये कराचीमध्ये १०८ धावांची खेळी केली होती.

- वॉर्नरने ७८ चेंडूंमध्ये शतकी खेळी करताना सिडनी मैदानावर सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा नवा विक्रम नोंदवला. यापूर्वीचा विक्रमही वॉर्नरच्याच नावावर होता. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ८२ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

‘दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये स्थान मिळवणे सन्मानाची बाब आहे. कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेन, अशी आशा आहे.’
-डेव्हिड वॉर्नर,
आॅस्ट्रेलियन सलामीवीर

Web Title: Warner in 'Bradman Club'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.