वॉर्नर विरुद्ध गंभीर
By admin | Published: April 30, 2017 03:08 PM2017-04-30T15:08:16+5:302017-04-30T15:08:16+5:30
थोड्याच वेळात केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना सुरू होत आहे.
आॅनलाइन लोकमत
डेक्कन, दि. 30 - थोड्याच वेळात केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना सुरू होत आहे. मात्र हा सामना या दोन संघांपेक्षा गौतम गंभीर विरुद्ध डेव्हिड वॉर्नर असाच राहील. केकेआर आणि सनरायजर्स हे दोनही संघ तुल्यबळ आहे. वॉर्नर, मॅकक्युलम यांच्याकडे फिरत असलेली आॅरेंज कॅप गंभीरने आपल्याकडे खेचून घेतली. वॉर्नर दुसऱ्या स्थानावर असला तरी तो गंभीरपेक्षा ४५ धावांनी मागे आहे. ही आॅरेंज कॅप त्याच्याकडून खेचून घेण्यासाठी वॉर्नर उत्सुक असेल. मात्र त्यासोबतच त्याला आव्हान आहे ते स्पर्धेत ३३१ धावा करणाऱ्या रॉबिन उथप्पाचे. उथप्पा सध्या सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. केकेआरची फलंदाजी मजबूत आहे. केकेआरला सापडलेला सर्वात महत्त्वाचा मोहरा म्हणजे सुनील नरेन, गेल्या सिझनपर्यंत केकेआरचा मुख्य गोलंदाज असलेला नरेन आता संघाचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे.
सलामीला येऊन तो प्रतिस्पर्धी संघाची पिसे काढतो. त्यासोबत रॉबिन उथप्पाला सापडलेला सूर ही केकेआरची जमेची बाजू आहे. तर मनीष पांडे आणि युसुफ पठाणही कोणताही सामना फिरवण्याची क्षमता आहे. नॅथन कुल्टर नाईल सध्या केकेआरच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतो आहे. गौतम गंभीर आपल्या आक्रमक नेतृत्वामुळे संघात एक उर्जा निर्माण करत आहे. त्यामुळे केकेआरची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. क्षेत्ररक्षणातही केकेआर करत असलेले नवनवे प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहेत. सनरायजर्स संघ १५ एप्रिल रोजी कोलकात्यामध्ये यापूर्वीच्या लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास प्रयत्नशील आहे. त्या लढतीत १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्सला १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर सनरायजर्स संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सलामीवीर शिखर धवन व केन विल्यम्सन यांना सूर गवसला आहे.
शिखर धवन धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचात आहे. सनरायजर्सची गोलंदाजी ही आयपीएलमधील सर्वोत्तमम गोलंदाजी मानली जाते. त्याचे मुख्य कारण आहे भुवनेश्वर कुमार त्याने आतापर्यंत ८ सामन्यात १८ बळी घेतले आहेत. तर युवा राशिद खान देखील केकेआरसाठी धोकादायक ठरु शकतो. राशिद खानने देखील ८ सामन्यात ८ गडी बाद केले आहेत.