अनिर्णीत कसोटीत वॉर्नरचे शतक
By admin | Published: January 8, 2016 03:32 AM2016-01-08T03:32:00+5:302016-01-08T03:32:00+5:30
पावसाच्या व्यत्ययाने गाजलेल्या आॅस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज यांच्यात गुरुवारी अनिर्णीत अवस्थेत संपलेल्या तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरच्या शतकाने प्राण फुंकले
सिडनी : पावसाच्या व्यत्ययाने गाजलेल्या आॅस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज यांच्यात गुरुवारी अनिर्णीत अवस्थेत संपलेल्या तिसऱ्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरच्या शतकाने प्राण फुंकले. या सामन्यात पावसामुळे अनेक तासांचा खेळ वाया गेला. अखेरच्या दिवशी ८२ षटकांचा खेळ झाला. त्यात वॉर्नरने १६वे कसोटी शतक झळकावून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. होबार्ड आणि मेलबोर्न कसोटी जिंकून मालिका आधीच २-०ने जिंकली हे विशेष.
याआधीच्या दोन कसोटींत वॉर्नरच्या सर्वोच्च धावा होत्या ६४. दुसरीकडे, सहकाऱ्यांनी मात्र या दोन्ही सामन्यांत ६ शतके ठोकली होती. स्थानिक वेळेनुसार ४ वाजून ५० मिनिटांनी सामना थांबविण्यात आला तेव्हा वॉर्नर नाबाद १२२, तर पीटर नेव्हिल ७ धावांवर नाबाद होते. विंडीजने पहिल्या डावात केलेल्या ३३० धावांच्या मोबदल्यात आॅस्ट्रेलियाने २ बाद १७६पर्यंत मजल गाठताच सामना ड्रॉ घोषित झाला.
उपाहाराआधी विंडीजचा डाव संपला. नाथन लियॉन
व स्टीव्ह ओकिफे यांनी आॅस्ट्रेलियाकडून प्रत्येकी ३ गडी बाद केले. विंडीजकडून दिनेश रामदीन याने सर्वाधिक ६२ धावांचे योगदान दिले.
मालिकावीराला रिची बेनो मेडल!
सध्या सुरू असलेल्या मालिकेत मालिकावीर पुरस्कारविजेत्याला ‘प्लेअर आॅफ द सिरीज’ म्हणून महान खेळाडू रिची बेनो यांच्या नावाने मेडल प्रदान केले जाणार आहे. लेग स्पिनर राहिलेले बेनो आॅस्ट्रेलियाचे कर्णधार होते. नंतर समालोचक म्हणून त्यांनी क्रिकेटचा प्रसार केला. त्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)