वॉर्नरच्या शतकाने भारतावर दबाव
By admin | Published: January 7, 2015 01:41 AM2015-01-07T01:41:25+5:302015-01-07T01:41:25+5:30
आॅस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत पहिल्याच दिवशी २ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा करून भारतावर दबाव निर्माण केला आहे.
सिडनी : डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि सलामीच्या अन्य फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत पहिल्याच दिवशी २ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा करून भारतावर दबाव निर्माण केला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वॉर्नर (१०१) आणि ख्रिस रॉजर्स (९५) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या २०० धावांच्या भागीदारीच्या बळावर पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या उणिवा उघड्यावर पाडल्या. दोन्ही सलामीवीर एकामागोमाग तंबूत परतल्यानंतर कर्णधार स्टिवन स्मिथ (८२*) आणि शेन वॉटसन (६१*) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी करून भारतासमोरील अडचणी वाढवल्या.
प्रथम फलंदाजीला आलेल्या वॉर्नर आणि रॉजर्स या जोडीने आॅस्ट्रेलियाला मजबूत सुरुवात करून दिली. १९ धावांवर असताना रॉजर्सला लोकेश राहुल याने दिलेले जीवदान भारताला महागात पडले. वॉर्नरनेही सामन्यावर वर्चस्व गाजवत कारकिर्दीतले १२वे शतक पूर्ण केले. रॉजर्सला मात्र पाच धावांनी शतकाने हुलकावणी दिली. वॉर्नरने ११४ चेंडूंत १६ चौकारांसह १०८ धावा, तर रॉजर्सने १६० चेंडूंत १३ चौकारांसह ९५ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार स्टिवन स्मिथ आणि शेन वॉटसन यांनी संघाचा डाव सांभाळला. कोहलीने गोलंदाजीत बदल करीत स्मिथ आणि वॉटसन या जोडीला बाद करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु ते अपयशी ठरले. या दोघांनी संघाला २ बाद ३४८ धावांचा पल्ला गाठून दिला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया : रॉजर्स त्रि. गो. शमी ९५, वॉर्नर झे. विजय गो. अश्विन १०१, वॉटसन नाबाद ६१, स्मिथ नाबाद ८२. अवांतर - ९; एकूण - ९० षटकांत २ बाद ३४८ धावा. गोलंदाजी - भुवनेश्वर २०-२-६७-०, उमेश १६-१-९७-०, मोहम्मद शमी १६-२-५८-१, अश्विन २८-५-८८-१, रैना १०-२-३५-०.