वॉर्नरच्या शतकाने आॅस्ट्रेलिया मजबूत
By admin | Published: December 29, 2016 01:15 AM2016-12-29T01:15:26+5:302016-12-29T01:15:26+5:30
पाकिस्तानच्या अज़हर अलीच्या द्विशतकानंतर डेविड वॉर्नरच्या शानदार शतकाने आॅस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत तिसऱ्या दिवशी आव्हान कायम ठेवले आहे. सलामीवीर
मेलबर्न : पाकिस्तानच्या अज़हर अलीच्या द्विशतकानंतर डेविड वॉर्नरच्या शानदार शतकाने आॅस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीत तिसऱ्या दिवशी आव्हान कायम ठेवले आहे. सलामीवीर वॉर्नरने (१४४) उस्मान ख्वाजा (९५) सोबत १९८ धावांची भागीदारी करत पाकिस्तानी गोलंदाजीचे कंबरडे मोडले. या दोघांच्या भागीदारीमुळे दिवसाअखेर आॅस्ट्रेलियाने दोन बाद २७८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
पाकिस्तानच्या अज़हर अली याने नाबाद २०५ धावा केल्या. आॅस्ट्रेलियात पाकिस्तानी फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने माजीद खान यांचा ४४ वर्षे जुना १५८ धावांचा विक्रम मागे टाकला. तर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कोणत्याही विदेशी फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमापासून तो फक्त तीन धावांनी मागे राहिला. मिसबाह उल हक याने ४४३ धावांवर डाव घोषित केला. या मैदानावर विदेशी फलंदाजाची सर्वाधिक धावसंख्या व्हिव रिचर्डस् यांनी नोंदवली होती त्यांनी २०८ धावा केल्या होत्या. अज़हर अली याने दहा तास फलंदाजी केली. त्याने ३६४ चेंडूंचा सामना करताना २० चौकार लगावले. आॅस्ट्रेलिया संघ १६५ धावांनी मागे आहे. तर आठ गडी अजून शिल्लक आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार स्मिथ १० तर ख्वाजा ९५ धावांवर नाबाद होते. (वृत्तसंस्था)
- वॉर्नरने एमसीजीवर बॉक्सिंग डे कसोटीत आपले पहिले तर एकुण १७ वे शतक केले. वॉर्नर ८१ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. वहाब रियाजच्या चेंडूवर तो बाद झाला होता. मात्र वहाबचा पाय क्रीज बाहेर पडल्याने तो नो बॉल ठरला. यानंतर १४४ धावांवर यष्टीरक्षक सर्फराजने त्याचा झेल घेतला. पंचानी बादचे अपिल फेटाळले. पाकनने या निर्णयाला आव्हान दिले. तिसऱ्या पंचांनी वॉर्नर बाद असल्याचा निर्णय दिला.
संक्षिप्त धावफलक : पहिला डाव पाकिस्तान - ४४३/९ (अजहर अली २०५, असद अशीक ५०, मोहम्मद आमीर २९, वहाब रियाज ६५, गोलंदाजी - जोश हेझलवुड ३/५०, जॅकसन बर्ड ३/११३, नॅथन लायन १/११५, मिशेल स्टार्क १/१२५), आॅस्ट्रेलिया २७८/२ (डेविड वॉर्नर १४४, उस्मान ख्वाजा खेळत आहे ९५, उस्मान ख्वाजा १०)