वेस्ट इंडिज बोर्ड एकादशची सावध सुरुवात
By admin | Published: July 10, 2016 10:44 PM2016-07-10T22:44:10+5:302016-07-10T22:44:10+5:30
वेस्ट इंडिज बोर्ड एकादश संघाने दोनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताविरुध्द विश्रांतीपर्यंत एक बाद ६७ धावा काढल्या.
सराव सामना : विश्रांतीला १ बाद ६७ धावांची मजल
बासेटेर : वेस्ट इंडिज बोर्ड एकादश संघाने दोनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताविरुध्द विश्रांतीपर्यंत एक बाद ६७ धावा काढल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५८ धावांवर पहिला डाव घोषित केला होता.
या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडिज एकादशने धावफलाकवर ७ धावा लागलेल्या असतानाच लिओन जॉन्सनच्या (२) रुपाने पहिला बळी गमावला. यानंतर सलामी फलंदाज राजेंद्र चंद्रिका (नाबाद ३५) आणि शाइ होप (नाबाद ३०) यांच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर विंडिज अध्यक्षीय संघाने आपला डाव सावरला. भुवनेश्वर कुमारने भारताला पहिले यश मिळवून देताना जॉन्सनला धवनकरवी झेलबाद केले. चंद्रिकाने ८३ चेंडूत ६ चौकार मारले असून होपने ८५ चेंडूत ४ चौकार लगावले आहेत.
तत्पूर्वी, शिखर धवन (५१), लोकेश राहुल (५०) आणि रोहित शर्मा (नाबाद ५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ६ बाद २५८ धावांची मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीयांनी शानदार खेळी केली. राहुलने ९९ चेंडूत ५ चौकार व १ षटकारांसह ५० धावा केल्या. डावखुरा सलामीवीर धवनने ७ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. यानंतर रोहित शर्माने १०९ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी केली. कर्णधार कोहली (१४) आणि अजिंक्य रहाणे (५) अपयशी ठरले. चेतेश्वर पुजाराने ३४ धावांचे उपयुक्त योगदान दिले.
शिखर व लोकेश यांनी वॉर्नर पार्कच्या संथ खेळपट्टीवर सावध सुरुवात केली. वेगवान गोलंदाजांचा मारा सावधपणे खेळणाऱ्या या जोडीने फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. दोघांनी ९३ धावांची सलामी दिली. शिखर व लोकेश निवृत्त झाल्यानंतर पुजाराने सूत्रे स्वीकारली. विराट (१४) व रहाणे (५) यांना विंडीजचा वेगवान गोलंदाज जोमेल वॅरिकनने तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर पुजारा (३४) निवृत्त झाला. रिद्धिमान साहा (२२) डॅमियन जेकबचे लक्ष्य ठरला.