आॅस्ट्रेलियन मीडियाचे वॉटसन, हॅडिनवर टीकास्त्र
By admin | Published: July 13, 2015 12:35 AM2015-07-13T00:35:25+5:302015-07-13T00:35:25+5:30
इंग्लंडकडून अॅशेजच्या पहिल्या कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या मीडियाने संघाचे अनुभवी खेळाडू शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांच्यावर टीकास्त्र सोडले.
कार्डिफ : इंग्लंडकडून अॅशेजच्या पहिल्या कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या मीडियाने संघाचे अनुभवी खेळाडू शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिन यांच्यावर टीकास्त्र सोडले.
यजमान इंग्लंडने गत अॅशेज चॅम्पियन आॅस्ट्रेलियावर पहिल्या अॅशेज कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी अंतिम सत्रात १६९ धावांनी दणदणीत विजय मिळवताना पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
विजयासाठी ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चहापानानंतर आॅस्ट्रेलियाचा डाव २४२ धावांत आटोपला आणि त्यांना मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला. आॅस्ट्रेलियन मीडियाने गुरुवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात बदल करण्याची मागणी केली आहे.
मीडियाने टीका करताना लिहिले, ‘‘संघातील काही स्टार फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याच्या गुडघेदुखीमुळे दुसऱ्या कसोटीत संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे, तसेच वॉटसनची चांगली वेळ आता पूर्ण झाली आहे आणि त्याने त्याचा आत्मविश्वास गमावला आहे. तो योग्य पद्धतीने फलंदाजी करूशकत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.’’
इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार शतक ठोकणाऱ्या ज्यो रुट याचा झेल सोडणाऱ्या यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन याच्यावरही मीडियाने जोरदार टीका केली आहे. हॅडिनला झेल घेण्याविषयी योग्य अंदाज येत नसल्याचे मीडियाने म्हटले आहे. ज्यो रुट याच्या शतकानंतर इंग्लंडने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी घेऊन आॅस्ट्रेलियावर दबाव वाढवला होता. मीडियात होत असलेल्या या टीकेनंतर वॉटसन आणि हॅडिनवर दुसऱ्या कसोटी संघात आपले स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी दबाव वाढला आहे. (वृत्तसंस्था)