वावरिंका, फेरर चौथ्या फेरीत
By admin | Published: January 24, 2016 02:21 AM2016-01-24T02:21:46+5:302016-01-24T02:21:46+5:30
जागतिक क्रमवारीतील चौथ्या नंबरचा खेळाडू स्वित्झर्लंडचा स्टेनिस्लास वावरिंका, आठव्या क्रमांकावर असलेला स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला विजयी
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील चौथ्या नंबरचा खेळाडू स्वित्झर्लंडचा स्टेनिस्लास वावरिंका, आठव्या क्रमांकावर असलेला स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला विजयी धडाका कायम राखताना चौथी फेरी गाठली. महिला गटातील लढतीत तृतीय मानांकित गारबाईन मुगुरुजाला पराभवाचा सामना करावा लागला. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंका हिने विजयी घोडदौड कायम राखली.
पुरुष गटातील एकेरी सामन्यात वावरिंकाने १ तास ५५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलचा ६-२, ६-३, ७-६ असा पराभव केला. आता पुढच्या लढतीत वावरिंकाला कॅनडाच्या मिलोस राओनिकचा सामना करावा लागेल. राओनिक याने सर्बियाच्या व्हिक्टर ट्राएकीचे आव्हान ६-३, ६-३, ६-४ अशा फरकाने मोडीत काढले.
आठवे मानांकनप्राप्त फेरर याने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनवर ६-१, ६-४, ६-४ असा विजय मिळवत चौथ्या फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत दहावे मानांकनप्राप्त अमेरिकेच्या जॉन इस्नर याने मॅरेथॉन लढतीत स्पेनच्या फेलिसियानो लोपेजचा ६-७, ७-६, ६-२, ६-४ अशा फरकाने फडशा पाडला, तर फ्रान्सच्या गाएल मोफिल्सने आपल्याच देशाच्या स्टीफन रॉबर्टवर ७-५, ६-३, ६-२ ने मात केली.
महिला गटात विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या मुगुरुजाला तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला झेक प्रजासत्ताकच्या बारबोरा स्त्रोकोव्हाकडून ६-३, ६-२ ने मात खावी लागली. सातवे मानांकन प्राप्त जर्मनीची एंजेलिक कर्बर आणि १४ वे मानांकनप्राप्त व्हिक्टोरिया अझारेंका यांनी स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली. कर्बर हिने अमेरिकेच्या मेडिसन ब्रेंगलवर ६-१, ६-३ ने विजय मिळविला, तर अझारेंका हिने जपानच्या नाओमी ओसाकावर ६-१, ६-१ अशी सरशी साधली. अन्य लढतीत रशियाच्या एकतेरिना मकारोव्हा हिने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिन प्लिस्कोव्हावर ६-३, ६-२ ने वर्चस्व मिळविले. (वृत्तसंस्था)
मरे अंतिम १६ खेळाडूंत
मेलबोर्न : ब्रिटनचा स्टार खेळाडू अँडी मरेने आॅस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत शानदार विजय मिळवित अंतिम १६ खेळाडूंत जागा मिळविली. या अनुभवी खेळाडूने पोर्तुगालच्या जाओ सोसावर तब्बल २ तास ६३ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-२, ३-६, ६-२, ६-२ असा विजय मिळविला. मरेचा सोसावर हा सलग ७ वा विजय ठरला.
कोंटाने
रचला इतिहास
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियात
जन्मलेल्या ब्रिटनच्या जोकाना कोंटा हिने झेक प्रजासत्ताकच्या डोनिसा अलरटोव्हा हिचा ६-२,
६-२ अशा फरकाने पराभव करून नवा इतिहास रचला. कोंटा गत
२९ वर्षांत आॅस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश करणारी पहिलीच ब्रिटिश खेळाडू ठरली आहे. कोंटाला पुढच्या लढतीत रशियाच्या एकतेरिना मकारोव्हाचा सामना करावा लागेल.