आम्ही चांगल्या स्थितीत : सोमदेव
By admin | Published: September 19, 2015 04:00 AM2015-09-19T04:00:25+5:302015-09-19T04:00:25+5:30
भारताला अव्वल संघ चेक प्रजासत्ताकविरुद्ध डेव्हिस कप विश्व ग्रुप प्ले-आॅफ लढतीत १-१ ची बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सोमदेव देववर्मनने भारतीय संघ
नवी दिल्ली : भारताला अव्वल संघ चेक प्रजासत्ताकविरुद्ध डेव्हिस कप विश्व ग्रुप प्ले-आॅफ लढतीत १-१ ची बरोबरी साधून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सोमदेव देववर्मनने भारतीय संघ चांगल्या स्थितीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
सोमदेवने चेक प्रजासत्ताकचा अव्वल खेळाडू जिवी वेस्लीचा ७-६, ६-४, ६-३ ने पराभव केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सोमदेव म्हणाला, ‘‘पहिल्या दिवशी १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर आम्ही सुस्थितीत असल्याचे म्हणता येईल. या लढतीत कुणीच आम्हाला दावेदार मानत नव्हते. पहिल्या दिवशी चेक प्रजासत्ताक संघाला १-१ ने बरोबरीत रोखणे निश्चित सुखद आहे. मी आजच्या विजयावर खुश आहे.’’
सोमदेव पुढे म्हणाला, ‘‘शनिवारी दुहेरीच्या लढतीत आम्ही निश्चितच दावेदार म्हणून उतरणार आहोत. लिएंडर पेस व रोहन बोपन्ना आम्हाला आघाडी मिळवून देतील, अशी आशा आहे. रविवार एकेरीच्या परतीच्या लढतीत पुन्हा एकदा चेक प्रजासत्ताक संघ दावेदार राहील. त्याच्या भात्यात अद्याप शस्त्र शिल्लक आहे. केवळ दुहेरीतच नाहीतर रिव्हर्स सिंगल्समध्येही ते काही बदल करू शकतात.’’
आपल्या कामगिरीबाबत आनंद साजरा करताना सोमदेव म्हणाला, ‘‘मी नक्कीच खुश आहे. मी आज सर्व्हिसमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. तुमच्याकडून विजयाची आशा नसेल तर तुमच्यावर दडपण येत नाही. त्याचा मला लाभ मिळला.
मी नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न केला. माझी सर्व्हिस चांगली होती. दुसऱ्या प्रयत्नातील माझी सर्व्हिसही चांगली झाली. बेंचवर असलेले माझे सहकारी मला सातत्याने सल्ला देत होते. त्यामुळे माझे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली.